मुंबई- बॉलिवूडची पद्मावती दीपिका पदुकोण पुन्हा एकदा देशाचं नाव उंचावणार आहे. गेल्या वर्षी दीपिकाने 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये ज्युरी सदस्य म्हणून सहभागी होऊन देशाचे नाव गाजवले होते. आता दीपिका पदुकोण 12 मार्च रोजी अमेरिकेत होणाऱ्या 95 व्या अकादमी पुरस्काराचा भाग बनली आहे. दीपिका येथे सादरकर्त्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या सोहळ्यात ती प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता आणि माजी रिंग रेसलर ड्वेन जॉन्सन (रॉक) सोबत दिसणार आहे. या बातमीमुळे संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली असून दीपिका पदुकोणच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या गुड न्यूजवर अभिनेत्रीचा पती आणि बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दीपिका पदुकोणची गुड न्यूज पोस्ट - दीपिकाने काल रात्री ही आनंदाची बातमी चाहत्यांना आणि देशाला सांगितली आहे. अभिनेत्री दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. या पोस्टसोबत दीपिकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'ऑस्कर'. अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी दिल्यापासून अभिनेत्रीचे सेलेब्स, चाहते आणि जवळचे मित्र तिचा आनंद व्यक्त करत आहेत आणि तिचे अभिनंदन करत आहेत. दीपिका पदुकोणचा स्टार पती रणवीर सिंगने पत्नीच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करणारे स्मित आणि तीन टाळ्या वाजवणारे इमोजी टाकले आहेत.