छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - मराठी चित्रपटसृष्टीला दोन दिवसात दोन मोठे झटके बसले आहेत. बुधवारी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. तर, गुरुवारी ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांचे दुःखद निधन झाले. जिल्ह्याचा विचार करता या दोन्ही दिग्गज कलाकारांचा सहवास काही वर्षांपूर्वी लाभला होता. पारो आणि रॉबर्ट गील यांच्या प्रेमकथेवर आधारीत 'अजिंठा' चित्रपट या दोघांच्या माध्यमातून तयार झाला होता. त्यामुळे अजिंठ्याचे दोन तारे निखळले अशी भावना व्यक्त केली जात आहे.
'अजिंठा' चित्रपट गाजला - 2012 मधे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसर चर्चेत राहिला, कारण वादग्रस्त असलेल्या पारो आणि रॉबर्ट गिल यांच्यावर आधारित अजिंठा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रसिद्ध कवी ना धो महानोर आणि प्रसिद्ध सिने कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी एकत्र येत हा चित्रपट तयार केला होता. महानोर यांनी अजिंठा चित्रपटाची कथा लिहिली होती, तर त्याचे दिग्दर्शन देसाई यांनी केले होते. त्यावेळी अजिंठा लेणी परिसरात काही महिने चित्रीकरण पार पडले. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्यासह विदेशी कलाकाराने चित्रपटात काम केले. सुरुवातीला पारो बाबत दिलेल्या माहिती वरून वाद सुरू झाला होता. पारो नेमक्या कोणत्या समाजाची असा वाद सुरू झाला, चित्रपट प्रदर्शित करू नका अशी मागणी पुढे आली, प्रदर्शन होऊ देणार नाही अशी परिस्थिती असताना महानोर आणि देसाई यांनी न डगमगता अजिंठा चित्रपट प्रदर्शित केला. त्यावेळी असलेल्या त्यांच्या वास्तव्यामुळे अनेकांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
अजिंठा परिसरात झाले चित्रीकरण - अजिंठा लेणी परिसरात चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले. पाच ते सहा महिने अजिंठा गावात, डोंगर दऱ्यांमध्ये कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. अनेक स्थानिक कलाकारांना त्यात काम करण्याची संधी मिळाली. त्या निमित्ताने लेण्यां साठी प्रसिद्ध असलेल्या अजिंठा परिसराला पारोच्या निमित्ताने महत्त्व प्राप्त झाले. बुधवारी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या जाण्याने परिसरात त्यांच्या विषयीच्या आठवणी आल्या, एक धक्का सहन करण्याआधीच गुरुवारी सकाळी भूमिपुत्र असलेले कवी ना धो महानोर यांच्या निधनाची वार्ता आली. 'अजिंठा' चित्रपट निर्मितीत महत्त्वाचे असलेल्या दोन व्यक्ती गेल्याने दुःख व्यक्त केले जात आहे.