मुंबई - kajol and DDLJ :आदित्य चोप्राचा पहिला चित्रपट 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' च्या प्रदर्शनाला 28 वर्षे पूर्ण झाली आहेत. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट ठरला होता. दरम्यान या खास प्रसंगी काजोलनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'या चित्रपटातील तिच्या लूकमधील एक क्लिप शेअर केली आहे. याशिवाय तिनं दोन फोटो देखील चाहत्यांसोबत शेअर केले. या चित्रपटामध्ये काजोलसोबत शाहरुख खान होता. पडद्यावर ही जोडी जबरदस्त हिट झाली होती. यानंतरच यांची जोडी ही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात रोमँटिक ऑनस्क्रीन जोडप्यांपैकी एक ठरली होती. या चित्रपटामध्ये सिमरनच्या भूमिकेत काजोलला प्रेक्षकांनी खूप पसंत केले होते.
काजोलनं शेअर केली पोस्ट : या चित्रपटाला 28 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करताना काजोलनं तिच्या पोस्टवर लिहलं, 'अजूनही हिरवा रंग घातला आहे, परंतु कदाचित तो शेड नसेल. 28 वर्षांनंतरही,'डीडीएवजे' तुमचा आहे मित्रांनो. आमच्या सर्व चाहत्यांनी याला खास बनवले आहे, ज्याची आम्ही कधीही कल्पना केली नव्हती. तुम्हा सर्वांना सलाम. काजोलनं या पोस्टमध्ये संपूर्ण कलाकारांना टॅग केले आहे. काजोलच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे. याशिवाय तिनं एक इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती किंग खानसोबत आहे. या फोटोमध्ये शाहरुख तिच्यावर एक फुलाद्वारे पाणी उडविताना दिसत आहे. हा चित्रपट 20 ऑक्टोबर 1995 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाची निर्मिती यश चोप्रा यांनी केली होती. याशिवाय करण जोहरनं या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.