नवी दिल्ली- दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख ( Delhi Commission for Women chief ) स्वाती मालीवाल ( Swati Maliwal ) यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर ( Anurag Thakur ) यांना पत्र लिहून #MeToo चळवळीदरम्यान अनेक महिलांनी ज्याच्यावर लैंगिक छळाचे आरोप लावले, त्या चित्रपट निर्माता साजिद खानला ( Sajid Khan ) बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे. बिग बॉसच्या 16व्या सीझनचा पहिला भाग 1 ऑक्टोबर रोजी प्रसारित झाला. तेव्हापासून स्पर्धक म्हणून असलेला साजिद खान शोमध्ये झळकत आहे. हा शो अभिनेता सलमान खान होस्ट करतो आहे.
"#MeToo चळवळीदरम्यान दहा महिलांनी साजिद खानवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. या सर्व तक्रारी साजिदची घृणास्पद मानसिकता दर्शवतात. आता या व्यक्तीला बिग बॉसमध्ये स्थान देण्यात आले आहे, जे चुकीचे आहे. मी, अनुराग ठाकूर यांना साजिद खानला या शोमधून काढून टाकण्याबद्दल लिहिले आहे," असे मालीवाल यांनी सोमवारी हिंदीमध्ये केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.