मुंबई - Rishi Kapoor and Dawood meet in Dubai : अलिकडे दाऊद इब्राहिम आजारी असल्याच्या, त्याच्यावर विषप्रयोग झाल्याच्या, रुग्णालयात बंदोबस्तात असल्याच्या अनेक बातम्या झळकल्या आहेत. अशावेळी त्याचे बॉलिवूड कनेक्शनचीही चर्चा अनेक बातम्यांचा विषय बनला आहे. अशातच दिवंगत अभिनेता ऋषी कपूरने त्याच्या आत्मचरित्रात दाऊदला भेटल्याचा किस्सा लिहिला होता. त्यानंतर काही वाहिन्यांवर ऋषी कपूर यांनी दाऊदशी झालेल्या भेटीचे वर्णनही केले होते. त्या मुलाखतीत त्यांनी व्यक्त केलेल्या भावना पुढील प्रमाणे आहेत.
"मार्च 1988 मध्ये ऋषी कपूर आणि दाऊची दुबईत भेट झाली होती. हे कसं जमून आलं होतं?, कशी भेट झाली आणि काय चर्चा झाली?", असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ऋषी कपूर म्हणाले, "मी दुबईला एका शोसाठी गेलो होतो. यामध्ये आरडी बर्मन, आशा भोसले यांचा कार्यक्रम होता. एअरपोर्टवर कुणीतरी माझ्या हातात फोन दिला आणि म्हटलं की, भाई तुमच्याशी बोलणार आहेत. पाहतो तर तो दाऊदचा फोन होता. तो म्हणाला, 'मला भेटायचं आहे चहासाठी येशील का?' मी म्हटलं हॉटेलवर चेकइन केल्यानंतर कळवतो. तर अशा प्रकारे मी त्याच्या भेटीस गेलो."
"तुम्हाला माहिती होतं का की दाऊद कोण आहे?", असे विचारताच ऋषी कपूर म्हणाले की, "हो मला माहिती होतं. त्यावेळी मुंबई बॉम्बस्फोट झाला नव्हता. त्यावेळी त्याला गँगस्टर म्हटलं जायचं आणि तो समाजात उघडपणे फिरत होता. तो काही जेलमध्ये नव्हता. आणि तिथंही जर असता तर आम्ही अशा माणसांकडून काही अभिनयाच्या गोष्टी शिकत असतो. त्यामुळे अशा लोकांना आम्ही भेटत असतो. त्यामुळे मी भेटायला गेलो. त्यांनी माझं चांगलं आदरातिथ्य केलं."
"दाऊदला ही शंका होती की त्याला घराचा पत्ता कळू नये म्हणून त्यानं गाडी फिरवून फिरवून त्याच्या घराकडे घेऊन जात होते, हे खरं आहे का?" या प्रश्नाचं उत्तर देताना ऋषी म्हणाले, "मला कछी भाषा येत नाही पण माझा जो मित्र होता त्याला ती येत होती. त्यांची चर्चा अशी होती की थोडावेळ सर्कल वगैरेवर फिरत राहा आणि जेव्हा फोन येईल तेव्हाच घराकडे जायचं. त्यामुळे पत्ता कळू नये म्हणून असं होतंय असं मला वाटलं होतं. तर मी त्याच्या घरी गेलो, चहापान झालं, तेव्हा तो म्हणाला की, 'खरंतर संध्याकाळीच बोलवणार होतो, पण मी दारु पीत नाहीत्यामुळे बोलवलं नाही.' त्यावेळी दाऊद म्हणाला की, त्याला माझं 'तवायफ' चित्रपटातील काम आवडलं होतं. तवायफ होणाऱ्या मुलींना वाचवण्याचं काम हिरो करतो आणि पुन्हा तिला समजात आणतो. तो सिनेमा महिला सक्षमीकरणावर होता. यामध्ये माझ्या पात्राचं नाव दाऊद होतं. त्याला हे पात्र आवडलं होतं. तो म्हणाला की पहिल्यांदाच दाऊद हे पात्र काही सकारात्मक काम करतानं दिसल्यामुळे तो माझ्या कामावर खूश होता."
"तर यामुळे दाऊदला ऋषी कपूर आवडायचा का?", या प्रश्नला उत्तर देताना ऋषी कपूर म्हणाले, "तसं मला सांगण्यात आलं. त्याला कपूर घराण्यातील कलाकारांबद्दल आदर होता. त्याने अनेक चित्रपट पाहिले होते. त्यामुळे मला भेटताना त्याला आनंद झाला होता. त्यावेळी राजकपूर हयात होते. त्यांच्यबद्दल अनेक चांगल्या गोष्टी त्यानं सांगितल्या."
"चार तासाच्या भेटीमध्ये दाऊद इब्राहिमचे कोणते किस्से आले?", असा प्रश्न मुलाखतकाराने विचारला असता ऋषी कपूर म्हणाले, "मी त्याला म्हटलं की मुंबईला का परत येत नाहीस. परत येऊन स्वतःला कायद्याच्या हवाली कर. तर तो म्हणाला, की मला न्याय मिळणार नाही. मी अनेक लोकांच्या विरोधात गेलोय आणि त्यामुळे त्यांना मला मारायचं असू शकतं, मला न्याय मिळणार नाही. त्यामुळे मी परत येऊ शकणार नाही. तो म्हणाला की, 'मी चूकीचं काम केलं आहे पण मी स्वतः कुणालाही मारलेलं नाही. मी इतरांकडून मारायला भाग पाडलंय. त्या लोकांना अल्लाहच्या नावावर चूकीच्या गोष्टी केल्या होत्या त्यामुळे मला तसं करावं लागलं होतं." ऋषी कपूर यांनी पुढे सांगितलं, "आता या गोष्टीला खूप वर्ष झालीत. बऱ्याच गोष्टी मला आठवत नाहीत पण त्या भेटीत मी काही लकबी आणि इतर गोष्टी शिकलो. ज्याचा उपयोग मी 'डी- डे' चित्रपटामध्ये केला होता. यात मी दाऊदची भूमिका केली होती. जर मी त्याला भेटलो नसतो तर मी 'डी- डे' चित्रपटात तसे काम करु शकलो नसतो."