मुंबई - David Beckham pens appreciation note : जागतिक फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम भारताच्या दौऱ्यावर असताना त्याची मुंबई भेट खूपच फलदायी ठरलीय. शाहरुख खाननं मन्नत या त्याच्या निवास स्थानी बेकहॅमचं स्वागत केलं आणि त्याच्यासोबत पार्टीही आयोजित केली. गौरी खान व त्याच्या मुलांसोबत डेव्हिड बेकहॅमनं छान संध्याकाळ घालवली. वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटचा आनंद घेतल्यानंतर तो अभिनेत्री सोनम कपूरच्या घरी पार्टीसाठी पोहोचला होता. सोनम आणि तिचा पती आनंद आहुजानं त्याच्यासाठी भव्य पार्टीचं आयोजन केलं होतं.
आता भारत दौरा संपवून मायदेशी परतताना डेव्हिड बेकहॅमनं शाहरुख खान व सोनम कपूरसाठी सुंदर चिठ्ठी लिहून त्यांचे आभार मानले आहेत. मुंबई भेटीत त्यांनी यजमान म्हणून केलेल्या सेवेचं कौतुक करत त्यांना आपल्या घरी येण्याचं आमंत्रणही दिलंय.
शाहरुख खानला आपला मित्र म्हणून संबोधत बेकहॅमने लिहिले, "गौरी खान व त्याची सुंदर मुलं आणि जवळच्या मित्रांसोबत जेवणाचा आनंद घेण्यासाठी शाहरुख खान या महान व्यक्तीनं आपल्या घरी स्वागत केल्याबद्दल सन्मान वाटतो. माझ्या भारत दौऱ्याचा समारोप करण्यासाठी हा सर्वात खास मार्ग होता. धन्यवाद माझ्या मित्रा - तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे माझ्या घरी कधीही स्वागत आहे...", असं त्यानं शाहरुखला उद्देशून लिहिलंय.
सोनम आणि तिचा नवरा आनंद यांच्याकडूनही प्रेमानं भव्य स्वागत केल्याल्यावर, बेकहॅमने लिहिले, " सोनम कपूर आणि आनंद आहुजा, या आठवड्यात तुम्ही यजमान म्हणून माझं प्रेमानं स्वागत केलंत. तुमच्या घरी निर्माण केलेल्या अप्रतिम संध्याकाळबद्दल धन्यवाद - लवकरच पुन्हा भेटू."