मुंबई -महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या ( Uddhav Thackeray Resigns ) राजीनाम्यानंतर गडगडले. त्यानंतर या सरकारला विरोध करणाऱ्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सरकार विरोधात केवळ विरोधी पक्षच नव्हता तर विरोधी पक्षाची बाजू नेहमी घेणारी बॉलिवूड क्विन कंगना रणौतही ( Kangana Ranaut ) होती. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात सतत आवाज उठवणाऱ्या कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाच्या अवैध बांधकामावर मुंबई महापालिकेने हातोडा चालवला होता. तेव्हा तिने या सरकारची घमेंड उतरेल अशी टीका केली होती. आता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा कंगनाने एक व्हिडिओ पोस्ट करुन अप्रत्यक्ष उध्दव ठाकरे व शिवसेनेवर ( Shivsena ) टीकेचा निशाणा साधला आहे.
''१९७५ नंतर भारताच्या लोकशाहीसाठी सर्वात महत्त्वाची वेळ आहे. १९७५ ला लोकनेता जेपी नायारण यांच्या सिंहासन सोडा या गर्जनेने सिंहासन सोडावे लागले होते. २०२० मध्ये मी म्हटले होते, लोकतंत्र एक विश्वास आहे. जे सत्तेच्या घमेंडीत हा विश्वास तोडतात त्याची घमेंड तुटणार हे निश्चित आहे. ही कोणत्या व्यक्ती विशेषची शक्ती नाही, ही शक्ती आहे एका प्रमाणिक चारित्र्याची. आणि दुसरी गोष्ट हनुमानजींना शिवाचा १२ वा अवतार मानले जाते आणि जेव्हा शिवसेनाच हनुमान चालीसावर बंदी आणते तेव्हा स्वतः शिवही वाचवू शकत नाहीत. हर हर महादेव, जय हिंद, जय महाराष्ट्र.'' असे कंगनाने आपल्या व्हिडिओत म्हटले आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने हिंदीत लिहिलंय, ''जब पाप बढ़ जाता है, तो सर्वनाश होता है और उस के बाद सृजन होता है…''