मुंबई - सुपरस्टार रजनीकांतच्या 'लाल सलाम' चित्रपटाचं पोस्ट प्रॉडक्शन सुरू असून 2024 च्या संक्रातीला हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. ऐश्वर्या रजनीकांत दिग्दर्शित, विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत असलेल्या 'लाल सलाम' चित्रपटात भारतीय क्रिकेटपटू कपिल देव स्वत: एक खास भूमिका साकारत आहेत. अलीकडेच कपिल देव यांनी त्यांच्या दृश्यांसाठी डबिंग पूर्ण केलं. डबींग नंतर काही फोटो त्यानं इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ऐश्वर्या रजनीकांतनं डबिंग स्टुडिओमधील कपिल देवचा फोटो शेअर केला होता. आपल्या चित्रपटात कपिल देवसारखा खेळाडू असणं हा एक सन्मान असल्याचं ऐश्वर्यानं म्हटलं होतं.
कपिल देव व्यतिरिक्त अभिनेत्री जीविता राजशेखर 'लाल सलाम' चित्रपटमध्ये रजनीकांतच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. 33 वर्षांनंतर ती पुन्हा एकदा अभिनयक्षेत्रात ती पुनरागमन करत आहे. निरोशा, थंबी रामय्या, सेंथिल आणि थंगादुराई यांसारखे इतर प्रमुख कलाकार रजनीकांतच्या या 'लाल सलाम' चित्रपटात छोट्या आणि महत्त्वाच्या भूमिका साकारतील. ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेले या चित्रपटाचं संगीत जानेवारी २०२४ मध्ये विविध भाषांमधील प्रेक्षकांना आकर्षित करेल, अशी अपेक्षा आहे.
याआधी सुपरस्टार रजनीकांतने खुलासा केला होता की माजी भारतीय क्रिकेटपटू आणि 1983 विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार कपिल देव त्याची मुलगी ऐश्वर्या दिग्दर्शन करत असलेल्या 'लाल सलाम' चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारणार आहे. ट्विटरवर रजनीकांतनं दिग्गज क्रिकेटपटूसोबत काम करणं सन्मानाचं असल्याचं सांगितलं. भारतासाठी पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक घरी आणण्याच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्याला कपिल देवबद्दल प्रचंड अभिमान आहे. प्रत्युत्तरादाखल, कपिल देवनंदेखील त्याचा आनंद शेअर केला. रजनीकांतच्या सहवासात असणं हा मोठा विशेषाधिकार असल्याचं कपिलनं म्हटलं होतं.