मुंबई - Cricket World Cup: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नईत खळल्या गेलेल्या क्रिकेट विश्वचषक सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुलनं दमदार खेळी करत देशाला पहिला विजय प्राप्त करुन देण्यात मोलाचं योगदान दिलं. विराट आणि केएल राहुलनं 165 धावांची दमदार भागिदारी करत विजयचा मार्ग सुकर केला. त्यामुळे दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव होतोय. दोघांच्याही चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव तर केला आहेच. शिवाय विराटची पत्नी अनुष्का शर्मा आणि राहुलची पत्नी आथिया शेट्टी यांनीही आपापल्या पतीचं अभिनंदन केलंय. विराटला करोडो लोक फॉलो करतात. पण यामध्ये पत्नी अनुष्का शर्माही त्याची सर्वात मोठी चीअरलीडर आहे. विश्वचषकात मिळवलेल्या पहिल्या विजयानंतर सोशल मीडियावर विराटला चाहत्यांच्या अफाट संख्येनं प्रतिक्रिया मिळत आहेत. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. यातच अनुष्का शर्मानेही तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ब्लू-हार्ट इमोटिकॉनसह कॅप्शन दिलंय.अथिया शेट्टीनं पती केएल राहुलच्या शानदार खेळीचे कौतुक केलं. अथियाने सर्वोत्कृष्ट माणूस म्हणत इन्स्टाग्राम स्टोरीजवर रेड हार्ट इमोटिकॉनसह पतीवरील प्रेम व्यक्त केलंय.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना अतिशय अटीतटीचा झाला. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकुन पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने मिचेल मार्शला शून्यावर गमावलं, पण सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (५२ चेंडूंत सहा चौकारांसह ४१ धावा) आणि स्टीव्ह स्मिथ (७१ चेंडूंत पाच चौकारांसह ४६ धावा) यांच्या दमदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. नंतर मार्नस लॅबुशेनने (२७) स्मिथच्या साथीने ऑस्ट्रेलियाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला, पण स्मिथ बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली. 199 धावांपर्यंतच मजल ऑस्ट्रेलियानं गाठली.
भारताला जिंकण्यासाठी 200 धावा आवश्यक होत्या. हे आव्हान अतिशय सोपं वाटत होतं. हा सामना भारत सहज जिंकणार, असाच अंदाज सर्वांनी बांधला होता. पण घडलं उलटंच. भारताचे सलामीवीर इशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा शून्यावर परतले आणि भारताला धक्का बसला. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरलाही खाते न खोलता तंबूचा रस्ता दाखवण्यात आला. भारताची धाव संख्या 3 बाद 2 अशी केविलवाणी झाली. अशावेळी या संकटातून बाहेर काढण्यासाठी विराट कोहली सरसावला आणि त्यानं केएल राहुलच्या साथीनं अचाट खेळी केली. विराट (११६ चेंडूंत सहा चौकारांसह ८५) आणि केएल राहुल (११५ चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ९७) यांच्यातील १६५ धावांच्या भागीदारीमुळे भारतानं सहा गडी राखून विजय मिळवला.