मुंबई - Cricket World Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ शनिवारी १४ ऑक्टोबरला विश्वचषकात आमने सामने येणार आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका कायम ठेवण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल. आतापर्यतच्या विश्वचषकांमध्ये सात सामने टीम इंडियानं सर्व सामने जिंकले आहेत. दरम्यान आता दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी अहमदाबादला पोहोचत आहेत. भारतीय संघाच्या बहुतांश सामन्यांच्या वेळी विराट कोहलीची पत्नी अनुष्का स्टेडियममध्ये उपस्थित असते. दरम्यान, आता अनुष्का शर्मा सकाळीच अहमदाबादला पोहोचली आहे. अहमदाबादला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये ती सचिन तेंडुलकर आणि दिनेश कार्तिकबरोबर होती. दिनेश कार्तिकनं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अनुष्का ही कार्तिक आणि सचिन तेंडुलकरसह दिसत आहे.
'हे' गायक आपल्या आवाजाची पसरवणारजादू :प्रसिद्ध पार्श्वगायक अरिजित सिंगही अहमदाबादला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमवर तो परफॉर्म करणार आहे. बीसीसीआयनं 'म्युझिकल ओडिसी' नावाच्या संगीत कार्यक्रमादरम्यान कलाकारांची स्टार-स्टडेड यादी देखील उघड केली. यामध्ये अरिजित हा दुसऱ्यांदा या स्टेडियमवर परफॉर्म करणार आहे. याआधी त्यानं आयपीएल २०२३च्या ओपनिंग मॅचपूर्वी परफॉर्म केलं होतं. याशिवाय सुखविंदर सिंग आणि शंकर महादेवन हे देखील गायक यावेळी परफॉर्म करणार आहेत. गायकांव्यतिरिक्त, दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचतील. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज गायक आणि अभिनेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री, बीसीसीआयने ट्विट केले की या कार्यक्रमात दिग्गज गायक अरिजित सिंग, सुखविंदर सिंग आणि गायक-संगीतकार शंकर महादेवन परफॉर्म करताना दिसेल. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये हे तीन गायक आपल्या आवाजाची जादू पसरवणार आहेत.