मुंबई - गेली ४ दशके संगीत क्षेत्रात आपली स्वतःची ओळख निर्माण केलेले ज्येष्ठ संगीतकार राजेश रोशन यांचा २४ मे रोजी वाढदिवस आहे. आजवर त्यांनी भारतीय संगीत व चित्रपटसृष्टीला भरीव योगदान केले आहे. सव्वाशेहून अधिक हिंदी चित्रपटांना त्यांनी मंत्रमुग्ध करणारे संगीत बहाल केले आहे. त्यांच्या गाण्यांनी तमाम सुपरस्टारच्या लोकप्रियतेत भर पडली. राजेश रोशन यांनी हजारो गाण्यांची रचना केली आणि सुरेल संगीताची पर्वणी दिली आहे.
राजेश रोशन यांना संगीताचा वारसा त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला. त्यंचे वडिल संगीतकार रोशन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार होते. वडिलांसोबत संगीताचे धडे गिरवणाऱ्या राजेश यांनी वयाच्या १८ व्या वर्षीच संगीतकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९७४ मध्ये कुँवारा बाप या चित्रपटासाठी त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी खूप गाजली. सज रही गली मेरी माँ हे मोहमद रफी आणि मेहबूब यांनी गायलेले गाणे तुफान हिट झाले. या चित्रपटासाठी इतर गाणी लता मंगेशकर, किशोर कुमार यांनी गायली होती. कुँवारा बापमधील चारही गाणी सुपरहिट ठरली आणि संगीतकार म्हणून राजेश रोशन यांच्या कारकिर्दीला यशस्वी सुरुवात झाली.
१९७५ मध्ये जुली या चित्रपटाची निर्मीती बी. नागिरेड्डी यांनी केली. या चित्रपटाचे संगीत त्याकाळातले सर्वात हिट ठरले. लता मंगेशकर, आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी स्वरसाज दिलेल्या राजेश रोशन यांच्या गाण्यांनी लेकांना वेड लावले. त्यावर्षीचा सर्वेत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार राजेश रोशन यांना मिळाला. त्यानंतर त्यांच्याकेड चित्रपटांची संगीतासाठी रांगच लागली. नंतरच्या काळात वर्षातून किमान अर्धा डझन चित्रपटांसाठी त्यांचे संगीत असायचे. त्यांच्या करियरमध्ये त्यांना ८ वेळा फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकन मिळाली आहे आणि दोन वेळा ते विजेते आहेत.