नवी दिल्ली बॉलीवूडमधील लाल सिंग चड्ढा आणि शाबाश मिठू या चित्रपटांविरुद्ध दिव्यांग लोकांच्या कथितपणे विटंबना केल्याप्रकरणी अपंग आयुक्तांच्या न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार डॉ. सतेंद्र सिंग हे अपंग डॉक्टरांचे सह-संस्थापक आहेत व त्यांना 70 टक्के लोकोमोटर अपंगत्व देखील आहे. त्यांच्या तक्रारीवर आयुक्त कोर्टाने जारी केलेल्या नोटिसीची प्रत शेअर केली आहे.
तथापि, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून या प्रकरणावर कोणतीही पुष्टी मिळालेली नाही. नोटीसनुसार अपंग व्यक्तींसाठीच्या आयुक्तांच्या कोर्टाने लाल सिंग चड्ढा आणि शाबाश मिठू या चित्रपटाबाबत सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्याकडून या प्रकरणावर प्रतिक्रिया मागितल्या आहेत. तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की चित्रपट अपंग व्यक्तींच्या हक्क कायदा 2016 च्या तरतुदींचे उल्लंघन करत आहेत ज्याद्वारे विशेष अपंग लोकांबद्दल अपमानास्पद टिप्पणी करण्यात आली आहे.
लाल सिंग चड्ढा या चित्रपटाचा नायक हा कमी बुद्ध्यांक असणारा निरागस युवक आहे. जो सैन्यात दाखल होतो व पराक्रम गाजवतो. यात आमिर खानने मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपट प्रेक्षकांना आवडला असला तरी बॉक्स ऑफिसवर कमाई करु शकला नव्हता. आमिर खान प्रॉडक्शन, किरण राव आणि वायाकॉम 18 स्टुडिओज निर्मित लाल सिंग चड्ढा चित्रपटामध्ये करीना कपूर खान, मोना सिंग आणि चैतन्य अक्किनेनी देखील आहेत. हा फॉरेस्ट गंपचा अधिकृत हिंदी रिमेक आहे.