मुंबई - द कपिल शर्मा शोमध्ये नाना पाटेकर यांची भूमिका केलेला कॉमेडियन तीर्थानंद रावने धक्कादायक पाऊल उचलत लाइव्ह कॅमेऱ्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. फेसबुकवर लाईव्ह करत तो सुरुवातीला आपली व्यथा मांडताना आत्महत्येसारखे पाऊल उचलण्यास भाग पाडले, याबद्दल बोलताना दिसतो. त्यानंतर तो त्याच्या हातात असलेला विषारी द्रव्याने भरलेला ग्लास प्यायला.
तीर्थानंदला हे करताना पाहून त्याच्या काही ऑनलाइन असलेल्या मित्रांनी तातडीने जवळच्या पोलीस स्टेशनला फोन केला आणि या घटनेची माहिती दिली. काही वेळातच शांती नगर पोलीस स्टेशनचे पोलीस पथक त्याच्या घरी दाखल झाले. तेव्हा कॉमेडिन तीर्थानंद राव बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
तीर्थानंद राव यांनी त्याच्या लाईव्ह संभाषणात सांगितले की, तो एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहतो. त्या महिलेमुळे त्याच्यावर तीन ते चार लाख रुपयांचे कर्जही झाले आहे. ती महिला त्याला बेदम मारहाण करते आणि त्याचे मानसिक शोषणही करते. असे सांगितल्यानंतर तीर्थानंद रावने फिनाईलचा डबा उघडला आणि समोर ठेवलेल्या ग्लासमध्ये टाकून पिऊन टाकले. हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर हे लाईव्ह प्रसारण पाहणाऱ्यांना ऐनवेळी काय करावे सूचत नव्हते. अखेर त्याच्या काही ओळखीतल्यांनी पोलिसांची मदत घेतली आणि पोलिसांनी उचललेल्या तातडीच्या पावलांमुळे तो रुग्णालयापर्यंत पोहोचू शकला.
लाइव्ह संभाषणामध्ये तीर्थानंद राव म्हणाला की, 'मी परवीन बानो या महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहतो. तिच्या पतीचा १० वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. तिला दोन मुलीही आहेत. ती महिला मला मानसिक त्रास देत असते. मी तिला ९० हजार किमतीचा फोन दिला. त्याच्यासाठी सर्व काही केले आणि तिने माझ्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली.'