मुंबई - प्रत्येक अभिनेत्याला विविधांगी भूमिका साकारायला आवडतात. मनोरंजनसृष्टीत एखाद्या कलाकाराची एखादी भूमिका प्रसिद्ध झाली की त्याला/तिला त्याच त्याच प्रकारच्या भूमिका ऑफर होतात. त्यातून कलाकार टाईपकास्ट होतो. विनोदी कलाकारांच्या बाबतीत तर हे जास्त प्रमाणात घडत असते. कॉमेडी कलाकार इतर भूमिकांत फिट बसत नाहीत, अशी अनेक निर्माते दिग्दर्शक यांची धारणा झालेली असते. त्यामुळेच चित्रपटातून काम करताना वेगळ्या धाटणीची भूमिका करावी, असा आग्रह विनोदवीर कुशल बद्रिके याचा होता. छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रमात तो वेगवेगळ्या भूमिका करतो परंतु त्या सर्वांचा बेस असतो कॉमेडी. परंतु आता कुशल अतिशय वेगळ्या प्रकारच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. आगामी ऐतिहासिक चित्रपट ‘रावरंभा‘ मध्ये तो नकारात्मक भूमिका साकारतोय. या चित्रपटात तो क्रूरकर्मा कुरबतखान साकारत आहे.
कुशल साकारणार क्रूर कुरबतखान- कुशल बद्रिके त्याचा विनोदाच्या अफलातून टायमिंगसाठी ओळखला जातो. त्याच्या विनोदाने तो प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावतो हे जगजाहीर आहे. परंतु कुशल आता वेगळ्या रूपात भल्याभल्यांना धडकी भरवणार आहे. कुशल बद्रिके ऐतिहासिक चित्रपट आणि नकारात्मक भूमिका पहिल्यांदाच करीत आहे. कुशलने आपल्या भूमिकेबद्दल बोलताना असे सांगितले की, 'मी साकारत असलेला कुरबतखान हा विजापूरचा क्रूर हेर होता. तो शाही सल्तनतला खुश करण्यासाठी कुठल्याही थराला जाणारा आहे. अर्थात तो बहलोलखानचा वफादार सिपाही आहे आणि त्याचे वागणे कोणालाही चीड आणण्यासारखे आहे. अशा प्रकारची भूमिका साकारणं माझ्यातल्या अभिनेत्याला आव्हान होतं. मी या भूमिकेसाठी लुकवर मेहनत घेतली कारण दिसण्यातला वेगळेपणा भूमिकेसाठी महत्वाचा होता. तसेच मी काही लकबी आत्मसात केल्या आणि भूमिका साकारताना त्याचा खुबीने वापर केलाय. मायबाप प्रेक्षक माझ्या या वेगळ्या प्रयत्नाला आपलेसे करतील अशी आशा आणि खात्री आहे.'