मुंबई - CID fame actor Dinesh Phadnis :प्रेक्षकांच्या तीन पिढ्यांना टीव्हीच्या छोट्या पडद्यासमोर खिळवून ठेवणाऱ्या'सीआयडी' मालिकेतले पात्र लोकांच्या घरातले सदस्यच होऊन गेले होते. एसीपी प्रद्युम्न, अभिजीत, दया, डॉ. साळुंखे, डॉ तारिका या बुद्धिमान, झुंजार टीमचा आणखी एक सदस्य म्हणजे फ्रेड्रिक. थोडा वेंधळा मन मनाने स्वच्छ असलेला फ्रेड्रिक त्याच्या सर्व टीम मेंबर्सबरोबरच प्रेक्षकांचाही लाडका होता. अभिनेता दिनेश फडणीस तब्बल वीस वर्ष फ्रेड्रिक हे पात्र अक्षरशः जगले. 57 वर्षांचे दिनेश फडणीस गेले काही दिवस यकृताच्या आजाराने त्रस्त होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची तब्येत अधिक बिघडली. त्यामुळे त्यांना मुंबईतल्या तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दिनेश यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं. अखेर दोन दिवस त्यांची मृत्यूशी चाललेली झुंज थांबली आणि मंगळवारी सकाळी त्यांचं निधन झालं. दिनेश फडणीस रुग्णालयात दाखल झाल्याचं कळल्यानंतर सीआयडी टीमचे सदस्य त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात येऊन गेले होते.
शिवाजी साटम आणि दयानंद शेट्टी यांनी दिली प्रतिक्रिया : दिनेश फडणीस यांचे 'सीआयडी' तले सहकलाकार आणि अभिनेता दयानंद शेट्टी यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, "हा हृदयविकाराचा झटका नव्हता, त्याचं यकृत खराब झालं होतं, त्यामुळे त्यांना तत्काळ मालाडच्या तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. गेल्या दोन दिवसांपासून तो आजारी होता. आज सकाळी मला कळलं की त्याच्या तब्येत कोणतीही सुधारणा झालेली नाही''. त्यानंतर त्यांनी पुढं सांगितलं , "दिनेशवर इतर काही आजारांवर उपचार सुरू होते, पण औषधांचा त्याच्या यकृतावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळेच औषधे नेहमी काळजीपूर्वक घ्यावीत असा सल्ला दिला जातो. एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीवर उपचार करण्यासाठी घेत असलेल्या औषधामुळे दुस-या आजाराचा त्रास होऊ शकतो, हे तुम्हाला कधीच कळत नाही. अॅलोपॅथीच्या औषधांबाबत अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे." दिनेश फडणीसचा यांच्या निधनाबद्दल माहिती देत असताना शिवाजी साटम यांनी म्हटलं की, ''दिनेश आजारी होता. पण तो असा अचानक जाईल असं वाटलं नव्हतं. दिनेश माझा सहकलाकार कमी आणि कुटुंबातला सदस्य जास्त होता. त्याचं हे अचानक जाणं खूप व्यथित करणारं आहे.''