मुंबई : भारताचे 'चंद्रयान-३' अवकाशात इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. 'चंद्रयान-३'चे लँडर आज २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करेल. यापूर्वी चीन, अमेरिका आणि रशियाने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले आहे. परंतु आजपर्यंत कोणीही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचले नाही. चंद्रावर 'चंद्रयान ३' मोहिमेसाठी आता फक्त काही तास उरले आहेत. इस्रो हे विक्रम लँडरला सॉफ्ट लॅडिंग करून एक इतिहास रचणार आहे. आता देशासह संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या मिशन मूनकडे लागल्या आहेत. दरम्यान, भारतीय सिनेजगतात असे काही चित्रपट बनले आहेत, जे अंतळावर आधारित आहेत.
चांद पर चढ़ाई : भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच अभिनेता दारा सिंग यांनी 'चांद पर चढ़ाई' या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट १९६७ आला होता. या काल्पनिक चित्रपटाची निर्मिती टीपी सुंदरम यांनी केली होती. चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांची मोहीम पूर्ण होण्याच्या दोन वर्षांपूर्वी हा चित्रपट बनवण्यात आला होता. हिंदी चित्रपटसृष्टीचा कदाचित हा पहिला विज्ञानकथा चित्रपट होता.
झिरो : शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा स्टारर चित्रपट 'झिरो' २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात किंग खान चंद्रावर चालताना दिसला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाचे शूटिंग नासामध्ये झाले आहे. याआधी शाहरुखने त्याच्या क्लासिक चित्रपट 'स्वदेश'चे शूटिंग देखील नासामध्ये केले होते.
कोई मिल गया : २००३ मध्ये, हृतिक रोशनने 'कोई मिल गया' या चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. चित्रपटाच्या कहाणीत एक व्यक्ती आपल्या संगणकाच्या सहाय्याने अवकाशात संपर्क साधते. त्यानंतर पृथ्वीवर एलियन येतात. हा चित्रपट हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केला होता.