मुंबई- मराठी प्रेक्षक मराठी चित्रपट बघण्यास मोठ्या संख्येने जात नाहीत. मराठी चित्रपटांना थिएटर मालक सापत्न वागणूक देतात. हिंदी चित्रपट निर्मात्यांकडून मराठी चित्रपट निर्मात्यांना दुय्यम वागणूक मिळते. ही सर्व स्टेटमेंटस् नेहमी कानावर येत असतात, कारण मराठी चित्रपट फारसे चालत नाहीत. परंतु नुकताच प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट बटरफ्लायने मात्र या सर्वांवर मात करीत चांगला धंदा केलाय. नुकताच या चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात मुसंडी मारली असून पुढेही तो चांगला चालेल अशी अपेक्षा निर्माते बाळगून आहेत.
हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांच्या गर्दीत हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यांच्या स्पर्धेला तोडीस तोड टक्कर देत उभा राहिला आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे येथे बटरफ्लाय तिसऱ्या आठवड्यात पदार्पण करीत आहे. तसेच तो हाऊसफुल गर्दी खेचत आहे. हा प्रेक्षक पसंती मिळविलेला चित्रपट कुठलीही मोठी निर्मिती संस्था अथवा कुठलाही मोठा प्रोड्युसर वा कुठल्याही फिल्म स्टुडिओचा पाठिंबा नसताना चालतोय ही मराठी चित्रपटांसाठी चांगली बाब आहे.
बटरफ्लाय या चित्रपटाने दाखवून दिले की मराठी प्रेक्षकांना कौटुंबिक विषय तरलतेने हाताळलेला चित्रपट हमखास आवडतो. या चित्रपटाचे कथानक साधे, सरळ असून ती कथा मांडली गेली आहे सरळ सोप्या पद्धतीने. पदार्पणीय दिग्दर्शिका मीरा वेलणकर हिने मराठीचा स्वाद कायम ठेऊन संपूर्ण कुटुंब एकत्र पाहू शकेल असा सिनेमा बनविला असून त्यातील कलाकारांनी, महेश मांजरेकर, मधुरा वेलणकर, अभिजित साटम, सोनिया परचुरे, प्रदीप वेलणकर ई., तन्मयतेने यात काम केले आहे ज्याची सर्व स्तरावरून स्तुती होताना दिसतेय. तिने सिद्ध केले की केवळ भपकेबाज चित्रपट चालत नाहीत तर प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारे साधे चित्रपटदेखील चालू शकतात.