मुंबई- आदिपुरुष चित्रपटाची चर्चा वेगवेगळ्या कारणामुळे ट्रेंडिंग चार्टमध्ये टॉपवर सुरू होती. प्रभास आणि क्रिती सेनॉन यांच्यात सुरु असलेल्या प्रेमाची चर्चा, तिरुपती मंदिर परिसरात ओम राऊतने क्रिती सेनॉनचे घेतलेले चुंबन प्रकरण याची चर्चा सुरू असतानाच चित्रपट रिलीज झाला आहे. आता या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचा ट्रेंडही सुरू झाला आहे. आदिपुरुषमधील सैफ अली खानच्या रावणाच्या भूमिकेवर नेटिझन्स नाराज झाले आहेत.
आदिपुरुष बाबत नेटिझन्सनी घेतलेल्या भूमिकेला समाजातील एका मोठ्या वर्गाकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, लांब दाढी असलेला, काटेरी केसांचा दुष्ट असे रावणाचे चित्रण पाहून नेटिझन्स नाराज झाले आहेत. लेदर बेल्टच्या कपड्यांमध्ये भगवान हनुमानाचे स्वरूप पाहूनही इतर अनेकजण नाराज झाले आहेत.
सैफ अली खानने साकारलेल्या लंकेशवर अनेकांनी आक्षेप घेतला. यातील रावण विचीत्रपणे दाखवल्याचा ठपका निर्मात्यांवर ठेवण्यात आलाय. अभिनेता प्रभासनेही निराश केले असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त करत बॉयकॉट आदिपुरुष हा हॅशटॅग वापरलाय.
दुसऱ्या एका घटनेत, ब्राह्मण महासभेने ओम राऊत यांना नोटीस पाठवली होती, 'या चित्रपटात हिंदू देवी-देवतांचे चित्रण अत्यंत चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. विकृत रूप, चामड्याचे कपडे घातलेली पात्रे, चित्रपटात धार्मिक आणि जातीय द्वेष पसरवणारे संवाद आणि चित्रण आहे. रामायण हा आपला इतिहास आणि आपला आत्मा आहे, मात्र आदिपुरुषात भगवान हनुमानाला न्याय मिळालेला नाही.'