मुंबई -G20 summit : दिल्लीत नुकतेच झालेल्या जी20 शिखर परिषदेसाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. आता या सेलिब्रिटींच्या यादीत दीपिका पदुकोणही सामील झाली आहे. मंगळवारी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत, दीपिकानं जी20 शिखर परिषदेबद्दल लिहलं, भारताची 'उल्लेखनीय कामगिरी'. त्यानंतर रणवीर सिंगनेही शिखर परिषदेच्या यशाबद्दल पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केले. आता आलिया भट्टनेही या शिखर परिषदेबद्दल ट्विट करत हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हटलं आहे.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगची पोस्ट :दिल्लीतील जी20 शिखर परिषदेची स्टोरी शेअर करताना दीपिका पदुकोणनं लिहिलं, 'अभूतपूर्व जी20 शिखर परिषदेचं आयोजन केल्याबद्दल अभिनंदन! आपल्या देशाची क्षमता जगाला दाखवणारी एक संस्मरणीय आणि उल्लेखनीय कामगिरी आहे. दीपिकानं यामध्ये पंतप्रधान मोदींना देखील टॅग करत शुभेच्छा दिल्या आहे. त्यानंतर रणवीरनं त्याच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिलं, 'आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे यशस्वी जी20 शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल, उज्ज्वल भविष्यासाठी राष्ट्रांना एकत्र आणल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य. अशी पोस्ट लिहून त्यानं नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.