मुंबई - सुस्वरूप आणि गोड दिसणारी मराठमोळी अभिनेत्री रितिका श्रोत्री आतापर्यंत बोल्ड विनोदी चित्रपटांमध्ये दिसली. टकाटक, बॉईज, डार्लिंग सारख्या विनोदी चित्रपटांतून रितिकाने भूमिका केल्या आहेत. परंतु आता ती पूर्णतः रोमँटिक भूमिकेत दिसणार आहे, ‘सरी’ या आगामी मराठी चित्रपटातून. इनोसंट चेहऱ्याची रितिका घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री आहे. याआधी ती प्रामुख्याने बोल्ड, बिनधास्त, बेधडक भूमिकांत दिसली होती. अर्थात त्यामुळे तिलादेखील बोल्ड आणि ब्युटीफुल ही पदवी बहाल केली गेली होती. आता तिने ट्रॅक बदलला असून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या भूमिका करण्याचे ठरविले आहे. त्याच अनुषंगाने 'सरी' या चित्रपटात रितिका श्रोत्री एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार असून अश्या प्रकारची भूमिका ती प्रथमच साकारते आहे. आजवरच्या भूमिकेपेक्षा रितिकाची ही भूमिका हटके आहे. ‘सरी’ मध्ये रितिका दिया नावाची व्यक्तिरेखा साकारत असून ती अत्यंत अभ्यासू मुलगी आहे. ती पहिल्यांदाच सोज्वळ भूमिका साकारत असून या भूमिकेला रोमँटिक पैलू आहेत.
‘सरी’मधील भूमिकेबद्दल रितिका श्रोत्री म्हणाले की, ''मी आतापर्यंत बिनधास्त वाटतील अश्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे ‘सरी’ मधील शांत स्वभावाची सोज्वळ भूमिका साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. याआधी मी एक्सट्रोव्हर्ट टाईपच्या भूमिका केल्या असल्यामुळे प्रेक्षकांना माझा हा अवतार आवडावा म्हणून मी खूप मेहनत घेतली आहे. अश्या प्रकारची भूमिका साकारायला मिळाली हा माझ्यासाठी समाधान देणारा अनुभव आहे. माझ्या आधीच्या भूमिका प्रामुख्याने बहिर्मुख होत्या आणि आजची तरुण मुलगी जशी बिनधास्त वागते ते त्यातून अभिप्रेत होत आलंय. परंतु मी जे ‘दिया’ हे पात्र साकारत आहे तिचा स्वभाव भिडस्त आहे त्यामुळे व्यक्त व्हावेसे वाटले तरी तिला ते करता येत नाही कारण ती अंतर्मुख आहे. अर्थात मला ही भूमिका केल्यावर आंतरिक समाधान मिळाले की मी एकाच साच्यातील भूमिका करीत नाहीये. याहीपुढे मला विविधांगी भूमिका साकारायला आवडतील. प्रेक्षकांना माझी ‘दिया’ सुद्धा भावेल याची मला खात्री आहे.'