मुंबई - Bigg boss 10 : 'बिग बॉस कन्नड'च्या 10व्या सीझनमध्ये दिसणारा स्पर्धक वरथूर संतोष अडचणीत सापडला आहे. शोच्या मध्यावर त्याला अटक करण्यात आली. वरथूर संतोष 'बिग बॉस कन्नड'मध्ये वाघाच्या पंजाच्या नखानपासून बनवलेले लॉकेट परिधान करताना दिसला होता. यावर वनविभागाच्या पथकानं त्याच्यावर कारवाई केली असून शोमध्ये जाऊन वरथूर संतोषला अटक केली आहे. वरथूर विरुद्ध अजामीनपात्र कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आली आहे. 22 ऑक्टोबरला वन विभागाची टीम बिग बॉस कन्नड 10च्या सेटवर पोहोचली होती. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बिग बॉसच्या घरात जाऊन वरथूर संतोषला लॉकेट आणण्यास सांगितले.
'बिग बॉसमधील कन्नड' स्पर्धकाला झाली अटक :तपासादरम्यान वरथूर संतोषनं घातलेल्या लॉकेट हे वाघाच्या पंजाच्या नखाचे असल्याचे सिद्ध झाले. यावेळी वनविभागाच्या टीमनं 'बिग बॉस कन्नड' निर्मात्यांना वरथूरला त्यांच्या ताब्यात देण्यास सांगितले. काही तासांनंतर वरथूर हा 'बिग बॉस कन्नड'च्या घरातून बाहेर आला. त्यानंतर वनविभागाच्या टीमनं त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी उप वनसंरक्षक रवींद्र कुमार यांनी सांगितलं की, संतोषनं वाघाच्या पंजाच्या नखांचे लॉकेट घातल असल्यानं त्याला अटक करण्यात आली आहे. ही सार्वजनिक तक्रार असून तक्रारीनंतर, आम्ही तपासासाठी कोमाघट्टाजवळील 'बिग बॉस स्टुडिओ'मध्ये गेलो होतो. त्यानंतर त्याला लॉकेट मागण्यात आले. त्यानं हे लॉकेट हे अधिकाऱ्यांना विचारविनिमय केल्यानंतर सोपवले.