मुंबई - अमिताभ यांचा नातू अगस्त्य नंदा चित्रपट पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. नेटफ्लिक्सच्या द आर्चीज या लाइव्ह-अॅक्शन म्यूझिकल चित्रपटाचे त्याने शूटिंग सुरू केले आहे. त्याच्या या पदार्पणाचा अभिमान वाटत असल्याचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी सोमवारी सांगितले. श्वेता बच्चन नंदा आणि उद्योगपती निखिल नंदा यांचा मुलगा अगस्त्य हा झोया अख्तरच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या चित्रपटात लाडके कॉमिक बुक पात्र आर्ची अँड्र्यूजच्या भूमिकेत आहे.
नेटफ्लिक्सच्या द आर्चीज या चित्रपटातून अगस्त्य नंदासह शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर हे स्टार किड्स सिनेक्षेत्रात पदार्पण करीत आहेत. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एका चाहत्याचे ट्विट शेअर केले आहे. "अगस्त्य... तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होत आहे आणि आपल्या सर्वांमध्ये यापेक्षा मोठा आनंद असू शकत नाही. माझे आशीर्वाद, प्रेम आणि माझ्या सदैव शुभेच्छा.. चांगले कर.. आणि झेंडा फडकत ठेव," असे अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे.