मुंबई- 'कौन बनेगा करोडपती 14' च्या आगामी भागामध्ये मेगास्टार अमिताभ बच्चन स्पर्धकांसोबत एक मजेदार कार्यक्रम करताना 'पान' बनवताना दिसणार आहेत. द्वारकाजित मंडले, गोंदिया, महाराष्ट्र येथील पान दुकान मालक यांच्यासोबत पान बनवताना अमिताभ यांनी सुपारी, चेरी, वेलची किंवा इतर मसाले टाकून पान बनवले.
एपिसोडमध्ये, बिग बी स्पर्धकासोबत गप्पांचा आनंद घेत असताना हॉटसीटवर बसलेल्या द्वारकाजित मंडले यांचा पान शॉपचा व्यवसाय असल्याचे कळले. मग त्याच विषयवर अमिताभ यांनी गप्पा मारायला सुरुवात केली. यावेळी पार्श्वसंगीतामध्ये खायके पान बनारसवाला हे गीत उत्साह वाढवणारे होते. थोड्यावेळात मंचावर पान बनवण्याचे साहित्य आले. यावेळी अमिताभ यांनी द्वारकाजित मंडलेच्या सहकार्याने पान बनवले व ते द्वारकाजित यांना स्वतः भरवले. या पानाला 'बच्चन पान' असे नामकरण स्पर्धकाने केले असून या प्रकारचे पान आपल्या दुकानात विकणार असल्याचेही त्याने सांगितले.