मुंबई : १८ जुलै रोजी बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर आपला ३४वा वाढदिवस साजरा करत आहे. भूमीने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. याशिवाय ती एक पर्यावरणप्रेमी देखील आहे. भूमी अनेकदा पर्यावरणासंबंधित आपल्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. भूमीने वाढदिवासच्या खास दिवशी एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या काही महिन्यात ती 'द भूमी फाउंडेशन' सुरू करणार आहे. भारतातील प्रदूषणाचा प्रभाव कमी करण्यासाठी ही संस्था काम करणार आहे.
भूमी पेडणेकर घेतला मोठा निर्णय : भूमी पेडणेकरने यासंबंधित म्हटले, 'खरा बदल तेव्हाच घडू शकतो जेव्हा आपण आपल्या कृतीची जबाबदारी घेण्यास सुरुवात करू आणि समाज आणि मानवतेसाठी योग्य गोष्टी करण्यासाठी पुढे जाऊ. मला आपली पृथ्वी वाचवण्यासाठी काम करायचे आहे, तसेच येणाऱ्या पिढ्यांसाठी चांगले वातावरण निर्माण करून द्यायचे आहे. पुढे तिने म्हटले, ज्यांनी पृथ्वीच्या रक्षणासाठी आपले जीवन समर्पित केले आहे, अशा लोकांना सक्षम बनवून भूमी फाउंडेशन पर्यावरणाचे रक्षण करण्यात मोठी भूमिका बजावू शकली, तर मला याबद्दल खूप आनंद होईल.' तसेच तिने पुढे सांगितले, 'भूमी फाउंडेशन सुरू करण्याच्या दिशेने काम करताना मला आनंद वाटत आहे आणि तेही माझ्या वाढदिवसानिमित्त, यापेक्षा विशेष काहीही असू शकत नाही. माझ्या नावाचा अर्थ पृथ्वी आहे. मी माझ्या कमाईचा एक भाग भूमी फाउंडेशनला देईन जेणेकरुन या पैशाचा वापर पर्यावरणाच्या मदतीसाठी करता येईल.'