मुंबई- मराठी चित्रपटसृष्टी सध्या वेगाने धावू लागली आहे. अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाबरोबरच सिनेमांचे टिझर, ट्रेलर, संगीत लॉन्च सोहळे दणक्यात होताना दिसताहेत. 'रौंदळ' या चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत लाँच हे त्यातीलच एक. मुंबईतील महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात कुमार मंगत पाठक आणि बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते 'रौंदळ'चा ट्रेलर लाँच आणि संगीत प्रकाशन करण्यात आले. या ट्रेलर लॉन्चप्रसंगी रौंदळ चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञमंडळी उपस्थित होते. ख्वाडा आणि बबन या चित्रपटात चमकलेला भाऊसाहेब शिंदे या चित्रपटात एका रांगड्या भबूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
रौंदळ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भाऊसाहेब शिंदेचं आक्रमक रूप नजर खिळवून ठेवणारं दिसत आहे. नवखी अभिनेत्री नेहा सोनावणेसोबतची भाऊची केमिस्ट्री प्रेक्षकांचं लक्षवेधी ठरत आहे. अहंकाळ बाळगू नका, कारण सोन्याची लंका रावणाची होती पण अहंकारामुळे त्याचाही नाश झाला अशा आशयाची डायलॉगबाजी, अर्थपूर्ण संवाद ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात. एका सर्वसामान्य रांगड्या तरुणाचा अन्यायाविरोधातील निखराचा लढा 'रौंदळ'मध्ये पहायला मिळणार असल्याचे संकेत ट्रेलर पाहिल्यावर आपल्याला मिळतात.
खेड्या पाड्यातील गावगुंड राजकारण आणि त्यात पिचला जाणारा कष्टकरी शेतकरी, अत्याचाराच्या विरोधात वाचा फोडणारा नायक, त्याची अनोखी प्रेमकहाणी, सत्यासाठीचा संघर्ष आणि लढा, संपूर्ण समाज व्यवस्थेच्याविरोधात एकटा उभा ठाकलेला निर्भय नायक, सहकारी साखर कारखान्यातील राजकारण, मंत्रमुग्ध करणारे गीत-संगीत, खरीखुरे वाटणारे अॅक्शन सीन्स, सत्तेविरोधातील युद्ध, गुन्हेगारीविरोधातील स्वत:च्या हक्कासाठीची लढाई असे बरेचसे पैलू या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.