मुंबई: १९७१ मधील भारत-पाक युद्धाचे नायक भैरोसिंग राठौर यांचे निधन झाले. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना 27 सप्टेंबर रोजी छातीत दुखू लागल्याने आणि तापाच्या तक्रारीनंतर जोधपूरच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर काही दिवसांतच त्यांना येथून डिस्चार्ज देण्यात आला, मात्र पुन्हा त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा दाखल करावे लागले. एम्स प्रशासनाने भैरोसिंग यांना दाखल केल्यानंतर त्यांच्यावर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे 1963 मध्ये भरती झालेले भैरोसिंग 31 डिसेंबर 1987 रोजी बीएसएफमधून निवृत्त झाले. अभिनेता सुनील शेट्टीने 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर' चित्रपटात भैरोंसिंहची दमदार भूमिका साकारली होती.
भैरोसिंह यांच्या मृत्यूची माहिती मिळताच बीएसएफसह अधिकारी जवान रुग्णालयात पोहोचले आणि त्यांना अखेरचा निरोप दिला. जेपी दत्ता दिग्दर्शित 'बॉर्डर' या चित्रपटात सुनील शेट्टीने भैरोसिंगची उत्तम भूमिका साकारली होती, या चित्रपटात भैरोसिंगची व्यक्तिरेखा मारली गेली असली तरी खऱ्या आयुष्यात भैरोसिंग यांचे आता निधन झाले आहे.
सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर भैरोसिंग हे अज्ञाताचे जीवन जगत होते. भैरोसिंह राठौर यांचा जन्म शेरगडच्या सोलंकियातला गावात झाला. ते 1971 च्या युद्धात जैसलमेरच्या लोंगेवाला पोस्टवर 14 बटालियनमध्ये तैनात होते. या युद्धात भैरोसिंगने शत्रूंचा मुकाबला करून त्यांना नामोहरम केले होते. मेजर कुलदीप सिंग यांच्या 120 सैनिकांच्या तुकडीसह त्यांनी शत्रूंचा जोरदार मुकाबला केला.