मुंबई:सध्या दाक्षिणात्य चित्रपट आणि तेथील कलाकार यांना बॉलीवूड आणि इतर प्रादेशिक चित्रपटसृष्टीतून मागणी आहे. यावर्षी प्रदर्शित झालेले, हिंदीमध्ये डब झालेले, जवळपास सर्वच दाक्षिणात्य चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. अर्थातच संपूर्ण देशातील मनोरंजनसृष्टीचे त्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. आता दाक्षिणात्य चित्रपटातील स्टार अनुपसिंग ठाकूर (Anupsingh Thakur) मराठी चित्रपट बेभान मधून मराठीत पदार्पण करतोय. इतकेच नव्हे तर त्याने या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच पार्श्वगायन केले आहे. अनुपसिंग ठाकूरचे अभिनयासह पार्श्वगायक म्हणूनही मराठीत पदार्पण होत असलेले पाहून बॉलीवूडचा ॲक्शन स्टार विद्युत जामवालने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
वेगळ्या धाटणीचा चित्रपट: दाक्षिणात्य चित्रपटातील स्टार अनुपसिंग ठाकूरच्या पदार्पणाचा चित्रपट म्हणून बेभान या चित्रपटाची चर्चा आहे. बंदा बेभान (Banda Bhebhan) हे गीत अनुपसिंग ठाकूर याच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले आहे. शशिकांत पवार प्रॉडकशनच्या अंतर्गत मधुकर (अण्णा) देशपांडे रायगावकर आणि शशिकांत शीला भाऊसाहेब पवार यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. 'झाला बोभाटा', 'भिरकीट' असे उत्तम चित्रपट केल्यानंतर 'बेभान' हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट दिग्दर्शक अनुप जगदाळे (Anup Jagdale) घेऊन येत आहेत.