मुंबई - मराठी सिनेमा त्याच्या विषय आणि आशय यासाठी प्रसिद्ध आहे. कित्येक वर्षांपासून अनेक गुणी कलाकार मराठी मनोरंजनसृष्टीत उदयास आले. अनेक मराठी कलाकार, बऱ्याच स्त्री कलाकार सुद्धा, अनेक वर्षे आपल्या सर्वांगीण अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करताहेत. त्यातील काही मोजक्या आणि गुणी अभिनेत्री एकत्र आल्या आहेत. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा परब चौधरी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि सुकन्या कुलकर्णी मोने या चतुरस्त्र अभिनेत्री 'बाईपण भारी देवा' या चित्रपटातून एकत्र आल्या असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. मराठी आणि हिंदी चित्रपटांतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अशोक सराफ यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला.
'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची निर्मिती केली आहे माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज ने तसेच सह-निर्माते आहेत बेला शिंदे आणि अजित भुरे. याची प्रस्तुती केली आहे जिओ स्टुडिओजने. केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच सोहळ्याला रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा परब चौधरी, शिल्पा नवलकर, सुकन्या कुलकर्णी मोने, गायिका सावनी, संगीतकार साई - पियूष उपस्थित होते. सुचित्रा बांदेकर या मुंबई बाहेर शूटिंग करीत असल्यामुळे त्या या सोहळ्याला उपस्थित राहू शकल्या नाहीत. परंतु त्यांनी एक व्हिडिओ संदेश पाठविला आणि सर्वांना सुयश चिंतीले.
या सोहळ्याच्या सुरुवातीला पारंपरिक मंगळागौर नृत्याचा प्रकार सादर करण्यात आला आणि त्या गाण्याच्या शेवटी चित्रपटातील स्त्री कलाकारांनी भाग घेतला आणि त्या नृत्याला चार चाँद लावले. सर्वांची एनर्जी वाखाणण्यासारखी होती. याआधी या चित्रपटात गाण्याचे अनावरण सिद्धीविनायक दरबारी करण्यात आले होते. त्या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्यावर अनेल रिल्स बनत आहेत. 'बाईपण भारी देवा' ची टॅगलाइन आहे, हा चित्रपट प्रत्येक स्त्रीला आता स्वतःसाठी जगायला शिकवणार हे नक्की. 'बाईपण भारी देवा' येत्या ३० जून, २०२३ रोजी पासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.