मुंबई : बाईपण भारी देवा हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यात पूर्णतः यशस्वी झालाय. महिला प्रेक्षकांना डोळ्या समोर ठेवून बनवलेला हा चित्रपट सर्व वयोगटाच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सुरू असलेल्या कमाईचे आकडे ट्रेड पंडितांना चक्रावून टाकणारे आहेत. पहिल्या दिवशी सुमारे दीड कोटी रुपयांची कमाई झाली होती. त्यानंतर प्रत्येक दिवशी ही कमाई वाढत गेली. विशेष म्हणजे १५ व्या दिवशी चित्रपटाने २.६० कोटीची कमाई केली. आजपर्यंत चित्रपटाची एकूण कमाई ३९.९५ कोटी झाल्याने मराठी चित्रपट निर्माते, प्रेक्षक आणि व्यापार विश्लेषक अचंबित झाले आहेत.
रेटिंगमध्ये 'पठाण' चित्रपटाला मागे टाकले : शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटाला मागे टाकत 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. पठाण या चित्रपटाने देशभरात १००० कोटीचा टप्पा पार केला होता. या चित्रपटाचे जगभरात खूप नाव झाले होते. याशिवाय या चित्रपटाने देशांतर्गत चांगलीच कमाई केली होती, आणि चित्रपटसृष्टीत एक इतिहास रचला होता. आयएमडीबीवर शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाला ५.९ इतकी आयएमडीबी रेटिंग मिळाले होते. तसेच 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाला आयएमडीबीवर ८.८ इतके रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे आयएमडीबी रेटिंगमध्ये 'पठाण'वर 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट भारी पडला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे उलटले आहे तरी या चित्रपटाचा क्रेझ बघायला मिळत आहे. या चित्रपटाला बघण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये गर्दी करत आहे.