मुंबई- मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही, थिएटर मिळाले तर त्याकडे प्रेक्षक फिरकत नाहीत, अशी ओरड अधून मधून ऐकायला मिळत असते. पण त्याच वेळी दर्जेदार चित्रपट असेल, प्रेक्षकांची नस त्याने बरोबर पकडली असेल आणि मनोरंजनाची हमी पाहणारे प्रेक्षकच इतरांना देत असतील, तेव्हा प्रेक्षक थिएटरकडे स्वताःहून येतात असा अनुभव पुन्हा एकदा मराठी सिनेमा घेत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गेली १२ दिवस आपला मजबूत झेंडा रोवून उभा आहे.
प्रेक्षकांना भावले चित्रपटाचे कथानक- या चित्रपटाच्या रिलीज नंतर सकारात्मक रिव्ह्यू पाहायला मिळाले. पण खरंतर प्रेक्षक अशा रिव्ह्यूवरुनच चित्रपट पाहायला जातात असे नाही. सर्वात महत्त्वाची असते ती माऊथ पब्लिसिटी. या चित्रपटाला ती उत्तम लाभली आणि त्यामुळे प्रेक्षक थिएटरकडे वळले. मध्यम वर्गीय कुटुंबातील सहा बहिणी मंगळा गौरच्या स्पर्धेत भाग घ्यायचे ठरवतात. आता या सर्व बहिणी वेगवेगळ्या वयोगटाच्या आहेत. म्हणजे रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दिपा परब यांना डोळ्या समोर घेऊन त्यांची वये किती असतील याचा अंदाज केला तर आपल्या लक्षात येते. तर या वयाच्या या बहिणी आपआपल्या संसारात गुंतलेत, बाई म्हणून आजच्या समाज व्यवस्थित त्या स्वतःच्या पातळीवर लढत आहेत. त्याच वेळी त्यांच्यात बहिणी म्हणून ओढ, प्रेम आणि थोडी असूयाही आहे. या सर्वांची उत्तम गुंफन बांधून त्यांची टीम बनवण्याचा यशस्वी प्रयत्न केदार शिंदेने लीलया पार पाडलाय.
बॉक्स ऑफिसवर बाईपण भारी देवा- बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतो. याबद्दल दिग्दर्शक केदार शिंदेने एक पोस्ट शेअर केलीय. हा चित्रपट ब्लॉकबस्टर झाला असून या मराठी चित्रपटाने ऐतिहासिक कलेक्शन जमा केले आहे आहे. दहाव्या दिवशी चित्रपटांने ६.१० कोटी रुपयांचे कलेक्शन केले. १३. ५० कोटी इतके दुसऱ्या आठवड्याचे कलेक्शन झालंय. आणि १२ दिवसा अखेर चित्रपटाने एकूण २८.९८ कोटींची कमाई केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये केदारने मायबाप प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाचा आणि परमेश्वराच्या आशीर्वादाचा उल्लेख केलाय. हा चित्रपट आता प्रेक्षकांचा झाला असल्याचेही केदारने म्हटलंय. दुसऱ्या आठवड्यात शुक्रवारी २.३१, शनिवारी ५.२८ कोटी, रविवारी ६.१० कोटी, सोमवारी २.७९ कोटी अशी एकूण कमाई २८.९८ कोटी इतकी झाली असल्याचे ट्विट ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी केले आहे.