मुंबई- हल्ली ऑफिसेसमध्ये महिलांना मातृत्वाच्या रजेसोबताच पुरुषांना पितृत्व रजा देण्याचा प्रघात पडला आहे. नजीकच्या काळात एकल कुटुंब व्यवस्था जन्माला आली त्यामुळे मूल जन्माला येताना नवरा बायकोची तारेवरची कसरत असते. त्यामुळे हल्ली प्रेग्नेंट ही फक्त होणारी आईच नसून होणारे बाबाही असतात म्हटलं जात. म्हणूनच तर म्हणतात ना ‘वी आर प्रेग्नेंट’. या नऊ महिन्यांचा आनंददायी प्रवास ते एकत्र करतात. मग तो व्यायाम असो, डाएट असो, डॅाक्टरची व्हिजीट असो किंवा मग डोहाळे जेवण असो. असाच गोड अनुभव पाहायला मिळणार आहे सागर केसरकर लिखित, दिग्दर्शित ‘बेबी ऑन बोर्ड’मध्ये. नुकताच या सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर झळकला असून यात प्रतिक्षा मुणगेकर आणि अभिजीत आमकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘बेबी ऑन बोर्ड’बद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले, ‘’ही एक धमाल सीरिज आहे. हलक्याफुलक्या विनोदाने भरलेली ही सीरिज प्रेक्षकांना विशेषतः तरूणाईला जास्त जवळची वाटेल. हल्लीच्या कपल्समध्ये प्रेग्नेंसीचा प्रवास एकत्र असतो आणि हा प्रवास ते मनापासून त्यांच्या पद्धतीने एन्जॅाय करतात. प्रेक्षकांना नेहमीचं काहीतरी मनोरंजनात्मक हवं असतं आणि प्रेक्षकांची हीच अपेक्षा पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असतो. हा आशयही असाच आहे. सर्व कुटुंबानं एकत्र पाहावी, अशी ही सीरिज आहे.’’