मुंबई - निर्माता आनंद पंडित यांनी नेहमीच आशयपूर्ण चित्रपटांना आधार दिला आहे. हिंदी सिनेसृष्टीतील ते एक नामवंत निर्माता असले तरी मराठीतही त्यांनी उत्तम सिनेमांची निर्मिती केली आहे. आता त्यांचा 'बाप माणूस' हा नवा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. आनंद पंडित यांच्यासह गूजबम्प्स एंटरटेनमेंटनेही 'बाप माणूसची निर्मिती केली आहे.
आई इतकेच बापदेखील आपल्या अपत्यावर प्रेम करत असतो. मात्र त्याची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आईहून वेगळी असते. याच विषयावरील 'बाप माणूस' या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश फुलफगर यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा सिंगल पेरेंट असलेल्या बापाची आणि मुलीची आहे. आपल्या मुलीच्या संगोपनात तो सर्वस्व पणाला लावून लेकीची काळजी घेत असतो. तिला आईच्या प्रेमाची उणीव भासू नये यासाठी तो सतत प्रयत्न करतो. एका भावनिक आणि गुंतागुंतीच्या विषयाला प्रथितयश दिग्दर्शक योगेश फुलफगर यांनी हात घातला आहे.
'बाप माणूस' चित्रपटात पुष्कर जोगने बापाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अनुषा दांडेकर, कुशल बद्रिके आणि शुभांगी गोखले यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पुष्कर जोग आणि कीया इंगळे यांनी बाप लेकीमधील हळवे आणि सुंदर नाते पडद्यावर साकारले आहे. मराठी चित्रपट नेहमी सकारात्मक आणि आशयघन विषयाची सखोल मांडणी करतो. याच पठडीतील एक सुंदर विषय या चित्रपटात मांडण्यात आला आहे. 'बाप माणूस'च्या ट्रेलरमध्ये पुष्कर जोग आपल्या मुलीच्या सर्व जाबाबदाऱ्या पार पाडताना दिसतो. पण आई होणे शक्य नाही असा त्याला ज्येष्ठांकडून सल्ला मिळतो. पण तो त्याकडे दुर्लक्ष करतो. पुढे त्याच्या आयुष्यात एक मुली येते आणि आपल्या लेकीसाठी त्याची सुरू असलेली धडपड पाहते आणि त्याच्या जवळ येते. पुढे काय हाणार याची उत्कंठा मागे ठेवून ट्रेलर संपतो.
प्लॅनेट मराठीच्या इन्स्टाग्रामवर 'बाप माणूस'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'बाप हा आई नसतो कारण तो 'बाप' असतो ...' 'बाप माणूस' हा चित्रपट येत्या २५ ऑगस्ट पासून सिनेमागृहात दाखल होणार आहे.