मुंबई- मराठी चित्रपटांमध्ये जसे निरनिराळे प्रयोग हिट असतात तसेच मराठी गाण्यांतूनही होताना दिसतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर म्युझिकमध्ये जे प्रचलित असते तेदेखील मराठी सिनेमांतून प्रतीत होताना दिसते. रॅप, हा एक आंतरराष्ट्रीय गाण्याचा प्रकार जगभरात प्रसिद्ध आहे, अगदी भारतामध्ये सुद्धा. अनेक हिंदी रॅपर उदयास आले असून आता मराठीतही हा प्रकार रुजताना दिसतोय. आगामी मराठी चित्रपट सर्किटमध्ये एक रॅप बघायला मिळणार आहे जो मराठीतील प्रतिथयश गायक अवधूत गुप्तेने गायलं आहे. ‘सर्किट’ हा एक ऍक्शनपॅक्ड चित्रपट असून त्यात ‘वाजवायची सणकन' असे शब्द असलेले रॅप सॉंग नुकतेच प्रदर्शित झाले. हे गाणं गीतकार मंगेश कांगणे यांनी लिहिलं असून त्याला उत्तम प्रतिसादही मिळताना दिसतोय. या चित्रपटाचे संगीत अभिजीत कवठाळकर यांचं आहे.
कडक रॅप साँग ‘वाजवायची सणकन'- ‘सर्किट’ या चित्रपटातील ‘काहीसा बावरतो, काहीसा सावरतो' हे रोमँटिक गाणे याआधी प्रकाशित करण्यात आले होते आणि त्या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळालाय. हिंदी चित्रपाटांतील प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी ते गायलं असून त्याचे बोल लिहिले आहेत आनंद पेंढारकर आणि जितेंद्र जोशी यांनी. या चित्रपटातील नायक तापट स्वभावाचा असून त्याला लहान सहन गोष्टींवरूनसुद्धा राग येतो. त्याच्या स्वभावानुरूप रॅप सॉंग बनविण्यात आले असून ते चित्रपटात चपखलपणे बसलं आहे. या चित्रपटाद्वारे आकाश पेंढारकर दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहेत. हे गाणं रफटफ आणि ऍक्शनपॅक्ड स्वरूपात चित्रित करण्यात आलं असून यातून व्यक्तिरेखा फुलून येताना दिसतील असे दिग्दर्शकाचे मत आहे. तसेच ते म्हणाले की या चित्रपटातील हाय व्होल्टेज ड्रामा या गाण्यातून प्रतीत होताना दिसेल.