मुंबई - मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वातील हरहुन्नरी अभिनेता अतुल परचुरे यांच्याबाबत चिंता वाटणारी बातमी समोर आली आहे. अलिकडे त्यांनी आपल्या आरोग्य विषयीचा एक खुलासा केला होता, त्यामुळे त्यांचे चाहते काळजी करत आहेत. आपण एका वेदनादायी आजाराशी सामना केल्याचे त्यांनी म्हटले होते. अतुल परचुरे यांनी खुलासा केलाय की त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते. या आजाराबद्दल त्यांना कशी माहिती झाली आणि आता त्यांची तब्येत कशा आहे याचा खुलासा त्यांनी स्वतःचा केला आहे.
अतुल परचुरे त्यांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात फिरण्यासाठी गेले होते. या सुट्टी दरम्यान त्यांची भूक मंदावली होती. काहीतरी गडबड असल्याची त्यांना जाणीव झाली. यावर उपाय म्हणून त्यांनी काही औषधेही घेतली, परंतु त्याचा काहीच फायदा होत नव्हता.
भारतात परतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी अल्ट्रासोनोग्राफी केली. त्यावेळी त्यांच्या पोटात ट्यूमर सापडला आणि त्यात कॅन्सर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. यातून ते बरे होतील असा विश्वास डॉक्टरांनी त्यांना दिला. परंतु उपचारादरम्यान त्यांची तब्येत आणखी बिघडत गेली आणि शस्त्रक्रियेलाही विलंब झाला.
कॅन्सर झाल्याचे कळल्यानंतर पहिले उपचारच चुकले होते. त्यांच्या पँक्रियाला बाधा झाली आणि अडचणीत वाढ झाली. चुकीच्या उपचाराने प्रकृती बिघडत गेली. त्यांना चालताना, बोलताना त्रास होत असताना त्यांना डॉक्टरांनी दीड महिने प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रिया करण्यात अनेक अडथळे असल्याचे व त्यातून परिस्थिती आणखी बिघडू शकते असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर योग्य उपचारांना सुरूवात झाली आणि केमोथेरपी केली. या काळात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने त्यांना साथ दिली. योग्य उपचारानंतर अतुल परचुरे आता पूर्ण पणे बरे झाले आहेत. अद्यापही त्यांच्यावर उपचार सुरू असले तरी ते पूर्ण बरे असल्याचे म्हणाले.