मुंबई - Aparshakti's turning point of life: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला वळण देणारा एक क्षण येत असतो. त्यामुळे त्या व्यक्तीचं जीवन संपूर्णपणे बदलून जातं. ज्या कलाकृतीमुळे कलाकाराचं नाव होतं आणि ओघानं प्रसिद्धी आणि पैसेही मिळायला लागतात. त्यामुळे तो त्याच्या जीवनातला 'टर्निंग पाईंट' मानला जातो. अपारशक्ती खुराना हा अभिनेता आज आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालाय. 'दंगल', 'स्त्री', 'लुका छुपी', 'बद्रीनाथ की दुल्हनिया' आणि अगदी अलीकडच्या 'ज्युबिली' चित्रपटामुळे त्याच्या लोकप्रियतेत भर पडली आहे. त्याच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट ठरलेला क्षण कोणता होता याचा खुलासा त्यानं केला आहे.
अभिनेता अपारशक्ती खुराना हा आगामी रिअॅलिटी कुकिंग शो 'स्टार व्हर्सेस फूड सर्व्हायव्हल'च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये दिसणार आहे. तो हिमाचल प्रदेशात समुद्रसपाटीपासून 14,000 फूट उंचीवर असलेल्या स्पिती व्हॅलीमध्ये ख्यातनाम शेफ रणवीर ब्रार याच्यासोबत या शोमध्ये सामील झालाय. या शोमध्ये तो चित्तथरारक दृश्यांनी भरलेला 25 किमी पेक्षा जास्त ट्रेक करताना दिसेल. रणवीर ब्रार आणि अपारशक्तीमध्ये हास्य-विनोद, मजा मस्तीसोबतच काही खासगी गोष्टींचीही रंजक चर्चा होताना पाहायला मिळेल. एपिसोडमध्ये त्यानं आपल्या अभिनय कारकिर्दीला कसं वळण मिळालं, याचा खुलासा केलाय.
आयुष्याला वळण कसं मिळालं, असे रणवीरने विचारताच अपारशक्ती म्हणाला, 'प्रेक्षकांना 'दंगल' किंवा 'ज्युबिली' चित्रपट हा माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट वाटतो. पण खरं सांगायचं तर, ज्या दिवशी मी दिल्ली हायकोर्टातून दिल्लीतील रेडिओ स्टेशनवर शिफ्ट झालो, तोच खरा टर्निंग पाईंट होता. मी जे काम करायचो ते काम वाटत नव्हतं. मी 15-18 तासांच्या शिफ्टमध्ये न थकता अखंड काम करायचो. मला जे आयुष्यात करायचं होतं, त्यासाठीच त्या दिवशी फोन आला.'
अपारशक्तीनं चंदीगडमध्ये पाच वर्षे कायद्याचे शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यानं दिल्ली उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील अमरजित सिंग चंधोक यांच्या हाताखाली पहिली नोकरी केली. त्यांच्यासोबत तीन महिने काम करत असतानाचा त्याच्या आयुष्याला वळण देणारा फोन त्याला आला होता.
अपारशक्तीला स्वयंपाक आणि अभिनय समांतर बाबी वाटतात. दोन्ही हस्तकलामध्ये नाजूक संतुलन आवश्यक असल्याचं तो मानतो. तो म्हणाला, 'पाककला आणि अभिनय याच्यात एकमेकांशी खूप साम्य आहेत. हलका सा मिर्च मसाला, इधर से उधर हुआ, हलका सा भावना इधर से उधर हुआ, तो ना स्वाद बिगड जाता है.' या गोष्टीशी रणवीर ब्रार सहमती दाखवली. त्यानं आपल्या आजोबांच्या सल्ल्याचा उल्लेख करत सांगितलं की, 'माझे आजोबा म्हणायचे की मिठासारखं व्हा. मिठाची सुंदरता कशात आहे. जिथं असेल त्याचा पत्ता लागतो, नसेल तरी पत्ता लागतो, कमी असेल तरी पत्ता लागतो आणि जर बरोबर असेल तर कोणी म्हणत नाही मीठ योग्य आहे म्हणून. तेव्हा अभिनय असो की स्वयंपाक मिठासारखं व्हा, लक्षात येऊ नका.'