मुंबई - गेल्या काही वर्षांपासून असली हिरो म्हणून सोनू सूदचे नाव घेतले जाते. पडद्यावरील हिरो अनेक उदात्त कामे करीत असतो. परंतु खऱ्या आयुष्यात मात्र तो तसा असेलच असे नाही. किंबहुना जवळपास कोणताही पडद्यावरील हिरो सारखे खरे आदर्श आयुष्य जगत नाही. बऱ्याचदा पडद्यावरील आणि खासगी आयुष्यातील त्यांच्या इमेज परस्परविरोधी असतात. परंतु एक स्टार लोकांच्या नजरेत भरला तो म्हणजे सोनू सूद. तो पडद्यावर हिरोची कामे करतोच. परंतु बऱ्याचदा तो व्हिलन म्हणून प्रेक्षकांना सामोरा जातो. तरीही लोक त्याला खरा हिरो म्हणतात याचे कारण म्हणजे तो करीत असलेली समाजसेवा.
लॉकडाऊनच्या कठीण काळात सोनू सूदचा पुढाकार - दोन वर्षांपूर्वी आपण सर्वांनीच कोरोना कालखंड अनुभवला. लॉकडाऊन मधील अनेकांच्या हालअपेष्टा निरनिराळ्या असल्यातरी दुःख सारखेच होते. अनेकांच्या या दुःखावर सोनू सूदने फुंकर घातली. मुंबईत अनेक कामगार लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झाले. हीच परिस्थिती संपूर्ण देशात झाली होती. काम नाही म्हणून पैसे नाही, पैसे नाही म्हणून खायला नाही. अशा परिस्थितीत ते कामगार आपापल्या गावी जाऊ पाहत होते. परंतु प्रवासासाठी असणारी सर्व व्यवस्था बंद होती. त्यामुळे अनेकांनी पायीच मार्गक्रमण सुरू केले आणि हजारो मैल दूर असलेल्या आपल्या गावी पायी जायला निघाले. अर्थात हे सर्व भयंकर वाटत होते. वाईट दिसत होते. परंतु त्या कामगारांवर कोणती कुऱ्हाड कोसळली होती त्याची त्यांनाच जास्त कल्पना होती. अजून एका इसमाला ते जाणवत होते म्हणून त्या कठीण प्रसंगी तो या लोकांसाठी कणखरपणे उभा राहिला, आणि तो इसम म्हणजे सोनू सूद.
श्रमिकांचा मसिहा बनला सोनू सूद- जेव्हा शासन आणि शासकीय अधिकारी या लोकांसाठी काहीच करीत नव्हते तेव्हा सोनू सूदने सर्व कामगारांसाठी बसेसची व्यवस्था केली. मुंबईमध्ये बहुतांश कामगारवर्ग भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेला असतो. त्यामुळे सोनूने त्याच्या टीमच्या मदतीने उत्तम व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक दाखवत जास्तीत जास्त लोकांना आपल्या गावी धाडलं. त्यावेळी त्याला देवदूत अशी उपमा देण्यात आली होती. त्याने मोबाईलद्वारे संपर्क साधून अनेकांना आर्थिक तसेच इतर मदत केली. आजही तो लोकांच्या मदतीला धावून जात असतो. या लोकप्रिय कलाकाराला नेहमीच सोन्याचे हृदय असलेल्या माणसाची उपमा दिली जाते. आता सोनू सूदचे चाहते आणि फॅन्स यांनी त्याला तांदळात न्हाऊन काढले आहे. म्हणजे त्यांनी त्याच्या फोटोवर २५०० किलो तांदळाचा अभिषेक केला आहे.