महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा, 11 ते 15 जानेवारीला औरंगाबादमध्ये रंगणार सोहळा - Festival Selection for International Awards

यंदाच्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची ( Ajantha Ellora International Film Festival ) घोषणा करण्यात आली. बुधवार दि. ११ ते रविवार दि. १५ जानेवारी २०२३ ( Film Festival from 11th to 15th January ) या दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, औरंगाबाद येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या उपस्थितीत पार पडणार आहे, अशी माहिती चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी ( Chandrakant Kulkarni ) यांनी दिली.

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा
अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा

By

Published : Jan 10, 2023, 3:40 PM IST

Updated : Jan 10, 2023, 4:29 PM IST

औरंगाबाद- जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांना उपलब्ध करून देणारा आठवा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा ( Ajantha Ellora International Film Festival ) करण्यात आली. बुधवार दि. ११ ते रविवार दि. १५ जानेवारी २०२३ ( Film Festival from 11th to 15th January ) या दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, औरंगाबाद येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या उपस्थितीत पार पडणार आहे, अशी माहिती चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी ( Chandrakant Kulkarni ) यांनी दिली.

नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र औरंगाबाद प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल हा महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून मनजीत प्राईड ग्रूप व प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. एनएफडीसी,सूचना व प्रसारण मंत्रालय,भारत सरकार व सांस्कृतिक कार्य विभाग,महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. नाथ स्कूल ऑफ बिजनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (एनएसबीटी), अभ्युदय फाउंडेशन हे या महोत्सवाचे सहआयोजक आहेत. एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस या महोत्सवाचे नॉलेज पार्टनर आहेत.

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आर्टिस्टीक डायरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी

तळागाळातील कलावंतांसाठी महोत्सव - जागतिक दर्जाचे सर्वोत्त्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचावेत, चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलावंत व युवा पिढीतील सिनेमाची आवड असणाऱ्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, कला व तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपट जाणिवा अधिक सशक्त व समृद्ध व्हाव्यात, मराठवाडा व औरंगाबादचे नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगाने सांस्कृतिक केंद्र म्हणून व चित्रपट निर्मितीचे केंद्र म्हणून जागतिक पातळीवर पोहोचावे, औरंगाबाद शहरातील पर्यटन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांपर्यंत पोहोचावे, मराठवाडा विभागातील गुणवंत कलावंतांना चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट विषयातील तज्ज्ञ व तंत्रज्ञांपर्यंत पोहोचता यावे, त्यांच्यासोबत संवाद साधता यावा, तसेच आताचा मराठी सिनेमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावा, हे या महोत्सव आयोजनामागील उद्देश आहेत.

उत्कृष्ट चित्रपटांना पारितोषिक - महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात मागील वर्षाप्रमाणे स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. यात विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश असून पाच राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला एक लाख रुपये रोख रकमेचे सुवर्ण कैलास पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचा देखील समावेश असणार आहे. ज्युरी समितीच्या अध्यक्षा, कॅनडा येथील डॉक्युमेंटरी फेस्टिवलच्या संचालक व दिग्दर्शक ज्युडी ग्लॅडस्टोन (कॅनडा) हे असणार आहेत. तर ज्युरी सदस्य म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते साउंड डिझायनर बिश्वदिप चॅटर्जी (मुंबई), ज्येष्ठ छायाचित्रकार धरम गुलाटी (मुंबई), संकलक व दिग्दर्शक प्रिया कृष्णस्वामी (मुंबई) व प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक संदीप सावंत (मुंबई) हे मान्यवर असणार आहेत.

आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी महोत्सवाची निवड- फिप्रेसी ही चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. फिप्रेसी भारत हे जगभरातील महोत्सवांमधून उत्तम चित्रपट निवडून त्यांना पुरस्कार प्रदान करतात. त्या पुरस्कारांना आंतरराष्ट्रीय सन्मान मानला जातो आणि अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी यंदाच्या वर्षी अतिशय अभिमानास्पद बाब अशी की, या पुरस्कार निवडीसाठी फिप्रेसीने अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची निवड केली आहे. त्यांचे तीन विशेष ज्युरी महोत्सवातील (भारतीय सिनेमा स्पर्धा गट वगळता) इतर चित्रपटांकरीता विशेष परीक्षण करणार आहेत. या समितीचे ज्युरी अध्यक्ष एन.विद्याशंकर (बंगळूरू), रिता दत्ता (कोलकाता), मीना कर्णिक (मुंबई) हे मान्यवर या समितीत असणार आहेत.

असा असेल उद्घाटन सोहळा व जीवन गौरव पुरस्कार- फिल्म फेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळा बुधवारी, दि. ११ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता आयनॉक्स प्रोझोन, स्क्रिन क्र. ४ येथे पार पडणार आहे. या फेस्टिव्हलचे उद्घाटन प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी सुचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकारचे प्रधान सचिव अपुर्व चंद्रा (आय.ए.एस.) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द दिग्दर्शक व चित्रपट अभ्यासक अरूण खोपकर (मुंबई) यांना त्यांच्या भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे, अभिनेते किशोर कदम (सौमित्र), दिग्दर्शक समीर पाटील, निर्माते नितीन वैद्य, दिग्दर्शक गिरीश मोहिते, अभिनेते उमेश कामत, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, फेस्टिव्हल डिरेक्टर अशोक राणे, फेस्टिव्हल आर्टिस्टिक डिरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी, मनजीत प्राईड ग्रुपचे राजेंद्रसिंग राजपाल व नवीन बगाडिया, प्रोझोनचे सेंटर हेड कमल सोनी, आयनॉक्सचे सिध्दार्थ मनोहर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर यावर्षीची जागतिक पातळीवरील नावाजलेली स्पॅनिश फिल्म आय हॅव इलेक्ट्रिक ड्रिम्स फेस्टिव्हलची ओपनिंग फिल्म म्हणून प्रदर्शित केली जाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर आठव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समारोपची फिल्म म्हणून इराण येथील नो बीअर्स (इराण/२०२२) ही प्रसिध्द दिग्दर्शक जफर पनाही यांची फिल्म दाखविण्यात येणार आहे.


अशी आहे संयोजन समिती - औरंगाबादचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्या या महोत्सवात मराठवाड्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा तसेच अधिक माहितीसाठी www.aifilmfest.in या वेबसाईटवर तसेच info@aifilmfest.in या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती तथा यशवंतराव चव्हाण सेंटर, औरंगाबाद जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, सचिन मुळे, सतीश कागलीवाल, महोत्सवाचे डायरेक्टर अशोक राणे, आर्टिस्टीक डायरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी, डॉ. अपर्णा कक्कड, आकाश कागलीवाल, डॉ. आशिष गाडेकर, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, क्रियेटिव्ह डायरेक्टर शिव कदम, जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटींग, सुहास तेंडूलकर, डॉ. रेखा शेळके, प्रा. दासू वैद्य, डॉ. आनंद निकाळजे, डॉ. मुस्तजीब खान, मंगेश मर्ढेकर, शिवशंकर फलके, सुबोध जाधव, डॉ. कैलास अंभुरे, महेश अचिंतलवार, निखिल भालेराव आदींनी केले आहे.

Last Updated : Jan 10, 2023, 4:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details