मुंबई - अरुण गवळी या वादग्रस्त व्यक्तिमत्वावर आधारित ‘दगडी चाळ’ हा चित्रपट बनला होता आणि बराच चाललाही होता. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ ' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एखाद्या वादळासारखा आला आणि त्यानंतर 'चुकीला माफी नाही' असे म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी ऊर्फ ‘डॅडीं'ची पुन्हा सर्वत्र चर्चा सुरू झाली. त्याचा आता सिक्वेल येऊ घातलाय.
या चित्रपटाचे नवं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून यात पुन्हा एकदा अंकुश चौधरी सूर्याच्या भूमिकेत दिसतोय. ‘डॅडी’ आणि सूर्याचे नाते प्रेक्षकांनी याआधीच पाहिले आहे. 'डॅडी'च्या गुंडांसोबत होणाऱ्या भांडणानंतर सूर्या-डॅडींची होणारी मांडवली, 'डोकॅलिटी' वापरून काम करणारा 'सूर्या' डॅडींचा उजवा हात बनला, त्यात सूर्याचा कौटुंबिक ताण, हे सगळं प्रेक्षकांनी यापूर्वी पाहिलं आहेच.