मुंबई :टिव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या डोक्यावरून वडिलांची सावली उठली आहे. अंकिताचे वडील शशिकांत लोखंडे यांचे आदल्या दिवशी निधन झाले. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. वडिलांच्या अंत्यसंस्कारात अंकिता तिच्या आईची काळजी घेताना दिसली. अंकिता लोखंडे हिच्या वडिलांच्या पार्थिवावर ओशिवरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून वडिलांच्या अंत्यसंस्काराला पोहोचलेली अंकिता तिच्या आईला धीर देताना दिसली. वडिलांच्या निधनाने अंकिता आणि तिची आई खचून गेल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर या अंत्ययात्रेचे काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये अंकिताचा पती विकी जैन तिला सांभाळताना दिसत आहे.
अंकिता लोखंडे कर्तव्य पार पाडले :काही व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडे रडताना दिसत आहे. या दुःखाच्या काळात, अंकिताचा सर्वात मोठा आधार तिचा पती विकी जैन बनला, जो तिचे सांत्वन करताना दिसत आहे. अंकिता लोखंडेने वडिलांच्या अंत्यसंस्कारात मुलाचे कर्तव्य पार पाडले. तिने तिच्या वडिलांच्या तिरडीला खांदा दिला. अंकिता लोखंडेच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला अनेक टेलिव्हिजन स्टार्स उपस्थित होते. श्रद्धा आर्यसह अनेक स्टार्सनी ओल्या डोळ्यांनी तिच्या वडिलांना निरोप दिला. याशिवाय नंदीश संधू, तुषार टंडन यांसारख्या सेलिब्रिटींनी लोखंडे कुटुंबियांची भेट घेऊन शोक व्यक्त केला आहे.