मुंबई - Animal worldwide box office collection: रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला आणि अलिकडेच प्रदर्शित झालेला 'अॅनिमल' हा या वर्षातील सर्वात वेगळा चित्रपट ठरला आहे. काही जण या चित्रपटावर टीकेची झोड उठवत असले तरी तिकीट बारीवरची गर्दी काही ओसरत नाही. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अॅनिमल' आता एका आठवड्यापासून सिनेमागृहांमध्ये धूमधडाक्यात चालू आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जगभरात 563.3 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन जमा केले आहे. हा चित्रपट रणबीरच्या मागील ब्लॉकबस्टर 'संजू'च्या एकूण कमाईच्या जवळपास पोहोचला आहे. 'संजू'ची जगभरात एकूण कमाई 586.85 कोटी रुपये इतकी होती.
शुक्रवारी 'अॅनिमल' चित्रपटाच्या निर्मात्यांनी इंस्टाग्रामवर जगभरातील बॉक्स ऑफिस अपडेट शेअर केले. पोस्टरमध्ये ठळकपणे 563.3 कोटी रुपयांचे जगभरातील कलेक्शन झाल्याचं जाहीर केलं आहे. या पोस्टरमध्ये रणबीरच्या खांद्यावर बंदूक असल्याचे दाखवले आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या अंदाजानुसार 'अॅनिमल'ने भारतीय बॉक्स ऑफिसवर आधीच 338 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
भारतात रिलीजच्या सातव्या दिवशी 'अॅनिमल' ने 25.5 कोटी रुपयांची कमाई केली आणि त्याचे एकूण कलेक्शन 338 कोटी रुपये झाले. या जबरदस्त कामगिरीमुळे 'अॅनिमल'ने 'पठाण' आणि 'गदर 2' च्या बॉक्स ऑफिस कमाईला मागे टाकले आहे. या चित्रपटांची अनुक्रमे 330.25 कोटी आणि 284.63 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. तरीही, केवळ एका आठवड्यानंतर 'अॅनिमल' चित्रपटाची तडाखेबद कामगिरी असं सूचित करतेय की ते लवकरच 'जवान'च्या कमाईलाही मागे टाकू शकते. 'जवान'ने 367.5 कोटी रुपयांचा मोठा गल्ला जमा केला होता.
'अॅनिमल' दुसऱ्या वीकेंडमध्ये प्रवेश करत आहे. शाहरुख खानचा 'डंकी' आणि प्रभासची मुख्य भूमिका असलेला 'सालार' रिलीज होईपर्यंत या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कोणाचीही स्पर्धा करावी लागणार नाही. तोपर्यंत कमाईसाठी रणबीरच्या चित्रपटाला रान मोकळं आहे. विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'सोबत 'अॅनिमल' रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटानं आतापर्यंत केवळ 38.83 कोटी रुपये जमा करण्यात इतपत कमाई केलीय.