मुंबई - Animal Vs Sam Bahadur Advance Booking Collection : अभिनेता रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेला 'अॅनिमल' आणि विकी कौशल यांचा चरित्रपट 'सॅम बहादूर' 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्यानं चित्रपट रसिक अॅक्शन पॅक्ड मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत विकी कौशलच्या 'सॅम बहादूर' चित्रपटापेक्षा 'अॅनिमल'नं आघाडी घेतल्याचं सध्या चित्र आहे.
'अॅनिमल'नं आपल्या पहिल्या दिवसाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये बॉक्स ऑफिसवर आपली मोहोर उमटवली आहे. 'सॅम बहादूर'नं पहिल्या दिवशी माफक 1.24 कोटींची कमाई करण्यापर्यंत मजल मारलेली असताना 'अॅनिमल'नं 13.95 कोटी रुपयांची कमाई करुन मोठी आघाडी घेतली आहे. संदीप वंगा रेड्डी दिग्दर्शित 'अॅनिमल' चित्रपट हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळमसह अनेक भाषांमध्ये रिलीज होणार आहे.
सेन्सॉर बोर्डाकडून (CBFC) "A" प्रमाणपत्र मिळालं असतानाही 'अॅनिमल' चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. केवळ रविवारी 3 डिसेंबर रोजी हिंदीमध्ये 4,01,118, तेलुगूमध्ये 99,917 आणि तमिळमध्ये 1,511 तिकिटे विकली गेली आहेत. मल्याळम आणि कन्नडसह सर्व भाषांमध्ये या चित्रपटाची तब्बल 5,04,078 तिकिटे बुक झाली आहेत.
मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर' हा चित्रपट भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्ध आणि बांगलादेशच्या मुक्ती संघर्षाची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे.