मुंबई - Animal first song Hua Main: संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित आगामी 'ॲनिमल' या चित्रपटानं अगदी सुरुवातीपासूनच खळबळ उडवून दिली आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा ॲक्शन-पॅक थ्रिलरच्या टीझर रिलीज झाला होता. यातील दृष्यांनी चाहत्यांच्या अपेक्षा वाढवल्या. निर्मात्यांनी हळूहळू रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांची पोस्टर्सनी चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवत नेली. आता 'ॲनिमल' चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं असून यामध्ये चित्रपटातील 'हुआ मैं' गाण्याच्या रिलीजची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.
रश्मिका मंदान्नानं सोमवारी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर चित्रपटाचं पहिले गाणे रिलीज करण्याचे संकेत दिले होते. हे संकेत गाण्याशी संबंधित असल्याचा अंदाज चाहत्यांनी बरोबर लावला. दरम्यान, निर्मात्यांनी मंगळवारी नवीन पोस्टर शेअर केलं आणि उघड केले की हिंदीमध्ये 'हुआ मैं', तेलगूमध्ये 'अम्मी', तमिळमध्ये 'नी वादी', मल्याळममध्ये 'पेन्नाले' आणि कन्नडमध्ये 'ओह भाले' असे शीर्षक असलेले गाणे उद्या रिलीज केले जाणार आहे.
पोस्टरमध्ये रणबीर आणि रश्मिका हेलिकॉप्टरमध्ये रोमँटिक मुडमध्ये दिसत आहेत. निर्मात्यांनी पोस्टरच्या कॅप्शनमध्ये विविध भाषांतील हॅशटॅगचा वापर केला आहे. हे गाणे 11 ऑक्टोबरला रिलीज होणार असून प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
ॲनिमल चित्रपटामध्ये अनिल कपूरनं रणबीरच्या ऑन-स्क्रीन वडीलांची भूमिका साकारली आहे. रश्मिकाने गीतांजली ही त्याच्या प्रेयसीची भूमिका केली आहे, तर बॉबी देओल एक जबरदस्त खलनायकाच्या भूमिकेत आहे. सर्व आघाडीच्या कालाकारांचा आवेश पाहून चित्रपटात वेगवान घडामोडी घडणार याची प्रचिती टीझर पाहून येते. या चित्रपटाकडून रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्नाला खूप अपेक्षा आहेत. ही जोडी चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण ठरणार आहे.