मुंबई - Animal movie controversy:अभिनेता रणबीर कपूर आणि बॉबी देओल स्टारर 'अॅनिमल' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन 47 दिवस झाले आहेत. 47 दिवस पूर्ण होऊनही, 'अॅनिमल' बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन करताना दिसत आहे. आता काहीजण या चित्रपटाची ओटीटी रिलीजची वाट पाहत आहेत. दरम्यान 'अॅनिमल'च्या ओटीटी रिलीजबाबत खुलासा झाला आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अॅनिमल' चित्रपट नेटफ्लिक्सवर 26 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. चित्रपटाचे सहनिर्माते सिने 1 स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी केली आहे.
दोन प्रॉडक्शन हाऊसमध्ये झाला वाद : न्यायमूर्ती अनिश दयाल यांच्या खंडपीठाने याचिकेशी संबंधित काही स्पष्टीकरणांसाठी 18 जानेवारीला पुढील सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. सिने 1 स्टुडिओनं सुपर कॅसेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (टी-सीरीज) विरोधात याचिका दाखल केली आहे. दोन प्रॉडक्शन हाऊसने चित्रपटाच्या निर्मितीसाठी करार केला होता. याचिकेतील, या करारानुसार, सिने 1 स्टुडिओला 35 टक्के नफ्याचा वाटा द्यायचा होता. या याचिकेत आरोप करण्यात आला आहे की टी-सीरीज ने सिने 1 स्टुडिओकडून बॉक्स ऑफिस विक्रीबाबत कोणताही तपशील शेअर न करता नफा कमावला आणि या नफ्यातून त्यांनी कोणतेही पैसे दिले नाहीत.
'अॅनिमल' चित्रपटाब्दल वाद :सुनावणीदरम्यान, टी-सीरीजचे वकील अमित सिब्बल यांनी सांगितले की, 2 ऑगस्ट 2022 रोजी मूळ करारामध्ये सुधारणा करण्यात आली होती, ज्या अंतर्गत सिने 1 स्टुडिओने आपले सर्व हक्क टी-सीरीजला 2 कोटी रुपयांना विकले होते. या करारमध्ये त्यांनी साठ लाख दिले. अमित सिब्बल यांच्या या युक्तिवादानंतर न्यायालयाने सिने 1 स्टुडिओचे वकील संदीप सेठी यांच्याकडून सूचना घेऊन 18 जानेवारीला न्यायालयाला कळवण्याचे निर्देश दिले आहेत.