हैदराबाद - अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने शेवटी सिटाडेल मालिकेच्या भारतीय आवृत्तीचे शुटिंग पूर्ण केले. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सिटाडेलचे शुटिंग रॅपअप झाल्याची घोषणा सेल्फी फोटोसह केली आहे. सामंथाने गेल्या आठवड्यात कळवले होते की, मायोसिटिस या आजारावर उपचारासाठी ती दीर्घ सुट्टीवर जात आहे.
सिटाडेलचे शुटिंग संपले - सामंथाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, '१३ जुलै हा दिवस माझ्यासाठी नेहमीच खास, यादिवशी सिटाडेलचे शूटिंग पूर्ण झाले.' सामंथाने गेल्या आठवड्यात कुशी या चित्रपटाचेही शूटिंग संपवले होते. आता सिटाडेलचे शुटिंग संपल्यानंतर सामंथाच्या हाती असलेल्या सर्व प्रोजेक्टची कामे पूर्ण झाली आहेत.
सामंथाची भूमिका - सिटाडेल या मालिकेच्या भारतीय आवृत्तीचे दिग्दर्शन राज आणि डीके या जोडीने केले आहे. या वेब सिरीजमध्ये सामंथा रुथ प्रभूसह वरुण धवन आणि सिकंदर खेर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. यात सामंथा इंटेन्स अॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे. यात सामंथा गुप्तहेराची भूमिका साकारत आहे.
सामंथाच्या कुशीचेही शूटिंग पूर्ण- दरम्यान सामंथा आगामी कुशी या चित्रपटात विजय देवराकोंडासह झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवा निर्वाणा यांनी केले आहे. तेलुगु भाषेत बनलेला कुशी हा चित्रपट १ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट तेलुगुसह तमिळ, कन्नड आणि मल्याळम या दक्षिण भारतीय चार भाषामध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटातील अराध्या हे नवीन गाणे नुकतेच रिलीज करण्यात आलंय. हा एक प्रेमकथा असलेला चित्रपट आहे. यामध्ये जयराम, सचिन खेडेकर, मुरली शर्मा, लक्ष्मी, अली, रोहिणी, वेनेला किशोर, राहुल रामकृष्णा, श्रीकांत अय्यंगार आणि शरण्य या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.