मुंबई - जेव्हापासून हिंदी आणि साऊथ इंडियन चित्रपटसृष्टीतील कलाकारांची देवाण घेवाण सुरु झाली तेव्हापासून अनेक बॉलिवूडचे स्टार्स पॅन इंडिया फिल्म्स मधून दिसू लागले. लायगर हा एक नवीन पॅन इंडिया चित्रपट प्रदर्शित होतोय जो हिंदीत बनविण्यात आला असून दाक्षिणात्य भाषांतही प्रदर्शित होणार आहे. महत्वाचे म्हणजे दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा यात प्रमुख भूमिकेत असून त्याच्या नायिकेच्या भूमिकेत आहे अनन्या पांडे. आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्यासोबत अनन्या पांडेने वार्तालाप केला आणि त्यावेळी तिने तिच्या पहिल्या वाहिल्या पॅन इंडिया चित्रपटाविषयी बऱ्याच गोष्टी उलगडून सांगितल्या.
अनन्या पांडे म्हणाली, “माझे वडील (अभिनेते चंकी पांडे) खूप खूष आहेत की मी लायगर हा पूर्णतः मसाला चित्रपट करीत आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच मी लायगर चा भाग झाले. माझा हा पहिला पॅन इंडिया पिक्चर आहे आणि तो मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होतोय त्याबद्दल एक्ससाईटमेन्ट नक्कीच आहे. कम्म्युनिटी वॉचिंगचा अनुभव निराळाच असतो. हा एक पूर्णतः मसाला चित्रपट असून यातील भावनिक संघर्ष प्रेक्षकांना नक्कीच भावेल. यात भरपूर ॲक्शन असून मला जरी त्यात ती करायला मिळाली नसली तरी माझ्यामुळे ती घडते. मी शाळेत असताना तायक्वांदो शिकली होती परंतु त्यात खास प्रगती केली नव्हती. माझे कॅरॅक्टर खूप कॉन्फिडन्ट दर्शविण्यात आले असून चित्रपटात बरीच कॉमेडी पण बघायला मिळेल. मला यातील भूमिका साकारताना खूप गोष्टींवर काम करावे लागले. तसेच दिग्दर्शक पुरी यांचे व्हिजन खूप क्लियर आणि स्ट्रॉंग होते. त्यांनी जेव्हा मला स्क्रिप्ट ऐकविली तेव्हाच संपूर्ण सिनेमा माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला होता. अर्थातच ही बहिर्मुख भूमिका साकारताना मला खूप मजा आली.”
अनन्या पांडे साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा सोबत दिसणार असून लायगरमध्ये जागतिक ख्यातीचा मुष्टियोद्धा माईक टायसन सुद्धा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याबद्दल सांगताना अनन्या म्हणाली, “माईक टायसन हा जगप्रसिद्ध आहे आणि त्याच्यासोबत काम करायला मिळणे म्हणजे मी माझे भाग्य समजते. मी माझ्या नातवांना अभिमानाने सांगू शकेन की मी सुप्रसिद्ध माईक टायसन सोबत स्क्रीन शेयर केला होता. ही खरंतर लाइफलॉंग मेमरी आहे. विजय देवरकोंडा हा अतिशय गोड माणूस आहे. त्याचा चेहरा खूप इनोसंट आहे. लायगर मध्ये पडद्यावर तो जसा दिसतो, वागतो त्याच्या अगदी विरुद्ध स्वभाव आहे, प्रत्यक्षात. त्याने माझी खूप काळजी घेतली आणि काम करताना बरीच मदत देखील केली. तो अतिशय मृदू स्वभावाचा असून तो खूप लाजाळू देखील आहे. माझा पहिला सीन ‘रीॲक्शन’ चा होता तरीही तो फ्रेम मध्ये नसूनही, माझ्या रीॲक्शनस पर्फेक्ट याव्यात म्हणून, त्याने समोर उभे राहून संपूर्ण सीन एनॅक्ट केला. त्याच्या सोबत प्रोमोशन्स करताना वेगळाच अनुभव मिळाला. त्याने अप्रतिम काम केले असून त्याची मेहनत पडद्यावर उठून दिसते.”