मुंबई- गायिका आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आजपर्यंत त्यांनी अनेक गाणी गायली असून त्यांचे जेव्हा गाणे रिलीज होते तेव्हा त्याला प्रचंड व्ह्यूव्ज मिळतात हा आजवरचा अनुभव आहे.
अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी हिंदीत लिहिलंय, ''अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे !!.'' या कॅप्शनवरुन हे स्पष्ट झाले आहे की आगामी गीत हे मराठीत नसून पंजाबी भाषेतील आहे. टी सिरीज निर्मिती हे गाणे येत्या ६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. नवीन वर्षातील हे त्यांचे पहिलेच गाणे आहे. या वर्षातील हे सर्वात मोठे बॅचलोरेट अँथम, असेल असेही अमृता यांनी पुढे लिहिलंय.
अमृता फडणवीस यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांचा नवीन लूक पाहायला मिळत आहे. यामध्ये त्यांनी आधुनिक कपडे परिधान केले असून त्यांचा हा हटके लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. गाण्याचे बोल आणि त्यांचे कपडे यामुळे गाण्याबद्दलची उत्कंठा वाढली नसेल तरच नवल.
वयाच्या सहाव्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतलेल्या अमृता फडणवीस यांनी विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये गाण्याचे सादरीकरण केले आहे, तसेच अनेक व्यावसायिक आणि सामाजिक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत. प्रकाश झा यांच्या जय गंगाजलमधील "सब धन माती" या गाण्यातून त्यांनी पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित बायोपिक संघर्ष यात्रामध्येही त्यांनी तिने एक गाणे गायले आहे.