मुंबई - बॉलिवूडमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित नवा चरित्रपट बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. हा बायोपिक चित्रपट बनवण्याची संकल्पना आणखी दुसरी कोणाची नाही, तर अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची भूमिका असलेल्या 'टॉयलेट एक प्रेमकथा' या चित्रपटाच्या निर्मात्यांची ही संकल्पना आहे. मोदी यांच्या भूमिकेबद्दल सांगितले जातंय की, भारताचा महनायक अमिताभ बच्चन यांचा विचार या व्यक्तिरेखेसाठी होऊ शकतो.
प्रसिद्ध निर्माती प्रेरणा अरोरा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक बनवण्याचे ठरवले आहे. मोदी यांच्या व्यक्तिमत्वाचा खूप मोठा प्रभाव प्रेरणा यांच्यावर आहे आणि त्यांनी बायोपिकवर काम सुरू केले आहे. प्रेरणा यांच्या म्हणण्यानुसार मोदी यांची भूमिका साकारण्यासाठी अमिताभ बच्चन हे अतियोग्य कलाकार आहेत. बिग बी या भूमिकेला न्याय देऊ शकतात, असेही त्यांना वाटते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये त्यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला जाणार आहे. पंतप्रधान झाल्यानंतरची त्यांची राजकीय कारकिर्द, परराष्ट्र धोरण आणि विकास योजना याचे दर्शन घडवण्यात येणार आहे. इतकेच नाही तर कोविड १९ च्या महामारीत देश आणि जगाच्या लॉकडाऊनबाबतची त्यांची भूमिका लोकांसमोर ठेवण्यात येणार आहे. यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित एक बायोपिक बनला होता. यात मोदींची भूमिका विवेक ओबेरॉयने साकारली होती. मात्र बॉक्स ऑफिसवर आणि थिएटरकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. त्यानंतर हा सिनेमा ओटीटीवर उपलब्ध करण्यात आला आहे.
प्रेरणा अरोरा यांनी अमिताभ बच्चन ही मोदी यांच्या भूमिकेसाठी योग्य असल्याचे म्हटले असले तरी याबाबत त्यांनी बिग बी यांच्याशी संपर्क केला आहे किंवा नाही हे अद्याप उघड झालेले नाही. अमिताभ बच्चन यांच्याकडूनही याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. शिवाय या चित्रपटात इतर कलाकार कोण असतील याबाबतही काही माहिती देण्यात आलेली नाही. बच्चन यांच्या आगामी चित्रपटांचा विचार करता ते या बायोपिकला होकार देऊ शकतील का याबाबतही शंका आहे. शिवाय हा बोयपिक २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकांपूर्वी रिलीज करण्याची योजना असू शकते, त्यामुळे या भूमिकेसाठी बच्चन पुरेसा वेळ देऊ शकतील का असाही एक प्रश्न आहे.