मुंबई Amitabh Bachchan:सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा 'कौन बनेगा करोडपती' हा अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचा आवडता शो राहिला आहे. दरम्यान या शोचा सीझन 15 संपणार आहे. चार महिने टेलिकास्ट झालेल्या या सीझनमध्ये अनेक स्पर्धकांनी लाखो आणि करोडोंची कमाई केली. अमिताभ बच्चन अनेक वर्षांपासून हा शो होस्ट करत आहेत. बिग बींनी भावूक होऊन या सीझनला निरोप दिला, ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सीझनचा शेवटचा एपिसोड संपण्यापूर्वी शुभ रात्री म्हणताना अमिताभ यांच्या डोळ्यात अश्रू आले.
अमिताभ बच्चन झाले भावूक : 14 ऑगस्ट 2023 रोजी सुरू झालेला 'कौन बनेगा करोडपती' सीझन 15 चार महिन्यांनंतर संपत आहे. या सीझनचा शेवट 29 डिसेंबर 2023 रोजी होत आहे. या एपिसोड फिनालेचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन भावूक होत असून पाणावल्या डोळ्यांनी आणि जड अंतःकरणानं आपल्या चाहत्याचा निरोप घेताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन यांनी म्हटलं, ''देवीयो और सज्जनो अब हम जा रहे है, कल से ये मंच नही सजेगा''. या क्लिपमध्ये एक महिला अमिताभ बच्चन यांना देवाचा लाडका म्हणत आहे. ती महिला म्हणते की, "आमच्यापैकी कोणीही देव पाहिला नाही, पण आज आपण देवाच्या सर्वात प्रिय व्यक्तीला पाहत आहोत."