मुंबई - Amitabh Bachchan : हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार्स घराऐवजी व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. मुंबईत व्यावसायिक मालमत्तेचं भाडं जास्त आहे. दरम्यान अलीकडेच दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांनी वॉर्नर म्युझिक इंडिया लिमिटेडला पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर त्यांची मालमत्ता दिली आहे. 'बिग बी'ची ही मालमत्ता ओशिवरा भागात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही जागा 10,000 चौरस फूट कार्पेट एरियाची आहे. याशिवाय आता ओशिवरा येथील एका व्यावसायिक टॉवरमध्ये अजय देवगण आणि काजोल, शाहरुख खान, शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यासह अनेक बॉलिवूड अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकांनी गुंतवणूक केली आहे.
अमिताभ बच्चनची मालमत्ता : अमिताभ यांनी ऑगस्ट 2023 मध्ये या चार व्यावसायिक मालमत्ता खरेदी केल्या होत्या. मात्र या व्यवहाराबाबत अमिताभ यांची टीम आणि वॉर्नर म्युझिक इंडियाकडून अद्याप कोणतंही अधिकृत विधान समोर आलेलं नाही. बच्चन कुटुंबाकडे मुंबईत अनेक मालमत्ता आहेत आणि अलीकडेच अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांनी त्यांची मुलगी श्वेता नंदाला मुंबईतील जुहू भागात 'प्रतीक्षा' हा आलिशान बंगला भेट म्हणून दिला आहे. मनीकंट्रोलनुसार, ही लीज मार्च 2024 पासून सुरू होणार आहे.