मुंबई - सध्या भारतातील 10 शहरात क्रिकेट विश्वचषकाचे सामने विविध स्टेडियमवर सुरू आहेत. सामन्याचा निर्णय झाला की आतषबाजी करण्याची एक परंपरा आहे. त्यानुसार मोठ्या प्रमाणात आकाशत रोषणाईचे फटाके उडवले जातात. यापुढे आयसीसी विश्वचषक 2023 सामन्यांदरम्यान दिल्ली आणि मुंबईतील स्टेडियममध्ये फटाके न उडवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी घेतलेल्या या निर्णयाचं 'मेगास्टार' अमिताभ बच्चन यांनी कौतुक केलंय.
अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये एका बातमीच्या लेखाचा फोटो आणि स्टेडियमचा फोटोही शेअर केला आहे.
गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 33 व्या वनडे विश्वचषक 2023 च्या सामन्यात भारत आणि श्रीलंकेच्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी सांगितले की मुंबईत सामन्यानंतर स्टेडियमवर फटाक्यांची आतषबाजी होणार नाही.
एका निवेदनात जय शाह म्हटलंय की, भारतीय क्रिकेटची सर्वोच्च संस्था पर्यावरणविषयक समस्येबाबत संवेदनशील आहे. यासाठी त्यांनी हे प्रकरण आयसीसीकडे नेले आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कोणतेही फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला. ते पुढे म्हणाले की, बीसीसीआय पर्यावरणीय समस्यांशी लढण्यासाठी कटिबद्ध आहे आणि चाहते आणि भागधारकांच्या हितांना नेहमीच अग्रस्थानी ठेवणार आहे. बीसीसीआयने मुंबई आणि नवी दिल्ली या दोन्ही ठिकाणच्या हवेच्या गुणवत्तेबाबत तातडीची चिंता मान्य केली आहे.
भारताचा उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताने आतापर्यंत खेळलेले सर्व सात सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे. या क्रमवारीत त्यानंतर दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. गतविजेता इंग्लंड संघ सर्वात कमी गुण मिळवत गुणतालिकेत तळाशी आहे.